Maharashtra Winter: राज्यात पुन्हा थंडीचा कडाका सुरू; नागपूर, गोंदिया गारठले, थंडी कायम राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:00 IST2024-12-13T11:00:23+5:302024-12-13T11:00:39+5:30
सध्या मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांशी भागात आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढत असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार

Maharashtra Winter: राज्यात पुन्हा थंडीचा कडाका सुरू; नागपूर, गोंदिया गारठले, थंडी कायम राहणार
पुणे : राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली असून, गुरूवारी (दि.१२) सर्वात कमी किमान तापमान गोंदियात ९.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. नागपूरमध्येही ९.८ अंशांवर तापमान होते. पुढील काही दिवस किमान तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पुण्यात गुरूवारी किमान तापमान १३.३ अंशांवर होते.
सध्या पाकिस्तानवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. राज्यातही थंडी हळूहळू वाढू लागली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच गारठा वाढला आहे. गुरूवारी (दि.१२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याच्या नीचांकी ५.८ अंश तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला.
पश्चिमी चक्रावात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढली असून, परिणामी राज्यातही गारठा वाढत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील किमान तापमान ११ अंशांवर नोंदविण्यात आले. तर, नागपूरमध्ये ९.८ अंश सेल्सिअस नोंद झाली.
सध्या मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांशी भागात आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढत आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला.
राज्यातील किमान तापमान
पुणे : १३.३
नगर : ११.५
महाबळेश्वर : १३.६
नाशिक : ११.७
सोलापूर : १६.४
मुंबई : २१.६
परभणी : ११.५
बीड : ११.९
अकोला : १२.५
अमरावती : ११.४
चंद्रपूर : ११.८
गोंदिया : ९.८
नागपूर : ९.८