अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा २ दिवसांपासून विस्कळीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:11 IST2025-03-07T11:09:28+5:302025-03-07T11:11:18+5:30

गुरुवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला होता, मात्र अजूनही पाणीपुरवठा सुरळीत नाही

Citizens are suffering due to insufficient water supply Water supply in the eastern part of the pune city has been disrupted for 2 days | अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा २ दिवसांपासून विस्कळीतच

अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा २ दिवसांपासून विस्कळीतच

पुणे: भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलची केबल बुधवारी दुपारी जळाली, त्यामुळे पुणे शहराचा पूर्वेकडील भाग अशी ओळख असलेल्या वडगाव शेरी, धानोरी, विमाननगर, विश्रांतवाडी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. केबल दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी पूर्ण झाले असले तरी या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. या संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळ लागणार आहे. त्यामुळे सुरळीत पाण्यासाठी नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.

धानोरी, येरवडा, विश्रांतवाडी भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागाला भामा आसखेड धरणातून पाणी दिले जाते. पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही यामध्ये सुधारणा होत नसल्याचे गाऱ्हाणे स्थानिक नागरिकांकडून मांडण्यात येत आहे. त्यातच बुधवारी दुपारी भामा आसखेड धरणाच्या जॅकवेलमधील केबल जळाली. त्यामुळे वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा यासह ज्या भागांना भामा आसखेडमधून पाणीपुरवठा होतो अशा भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. बुधवारी दुपारनंतर बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद होता. हे काम तातडीने पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, गुरुवारी दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा फोल ठरल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी देखील या भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. पाणीपुरवठा कधी सुरळीत होणार याची चौकशी करणारे अनेक दूरध्वनी पालिकेकडे येत होते. केबल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी जॅकवेल बंद राहिल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे गुरुवारीदेखील नगर रस्ता आणि अन्य भागात पाणीपुरवठा विस्कळीत होता. या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळ होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

भामा आसखेड जॅकवेलमधील केबल जळाल्याने वडगाव शेरी, येरवडा, धानोरी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, शुक्रवारी दिवसभरात हा पाणीपुरवठा सुरळीत होईल. तक्रार करणाऱ्या नागरिकांना याची माहिती देण्यात आली आहे. - इंद्रभान रणदिवे, अधीक्षक अभियंता, लष्कर-बंडगार्डन पाणीपुरवठा

अघोषित पाणीकपातीबाबत खुलासा करा 

शहरात नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ‘पुणेकरांना तूर्त पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही’ असे जाहीर करण्यात आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील हे स्पष्ट केले. मात्र गेले काही दिवस सकाळी ९ वाजता जाणारे पाणी हे ८ वाजताच जाते याच्या अनंत तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ‘पर्वती जलकेंद्राच्या पंपिंग स्टेशनमधून ४१०० क्यूबिक मीटर ताशीच्या जागी ३८०० क्यूबिक मीटर ताशी असा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी लवकर जाते’ असे नावं जाहीर न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले. या माहितीत सत्य आहे का आणि ही अघोषित पाणीकपात आहे का, याचा त्वरित खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे संदीप खर्डकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

Web Title: Citizens are suffering due to insufficient water supply Water supply in the eastern part of the pune city has been disrupted for 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.