मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर विशेष प्रेम; तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी कामे पुण्यात होतील - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:49 IST2025-09-23T13:48:29+5:302025-09-23T13:49:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी २८ टक्के वरून ५ टक्के करत देशाला मोठी गिफ्ट दिली आहे. सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय लाेकांचेही कल्याण करत आहे

मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर विशेष प्रेम; तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी कामे पुण्यात होतील - चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळेच प्रत्येक दोन आठवड्यांनी मुख्यमंत्री पुण्याला येत आहेत. त्यांच्या स्वप्नातील पुण्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आदर्शवत असून, २०४७ पर्यंत ते प्रत्यक्षात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे मी खात्रीने सांगताे कारण त्या इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीत मी आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी कामे पुण्यात होतील, असेही ते म्हणाले.
पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बाेलत हाेते. गणेश कला क्रीडा मंच येथे साेमवारी (दि. २२) सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी आमदार उल्हास पवार, माजी मंत्री रमेश बागवे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महर्षी पुरस्काराचे मानकरी गिरीश प्रभुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, मेधा सामंत, शिरीष देशपांडे, प्रमिला मुदगेकर, डॉ. मयूर कर्डिले, प्रसन्न जगताप, आयोजक आबा बागुल, जयश्री बागुल आदी उपस्थित होते.
केशव शंखनाद मंडळाचे शंखनाद वादन आणि महालक्ष्मीची आरती करून महाेत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकातून आबा बागुल यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गाैरव करत अनेकांना तुम्ही पक्षात फटाफट घेता, तुम्ही आमचे समाज बांधव आहात, असे म्हणत राजकीय भाष्य केले. तसेच वाहतूक कोंडी फोडण्यासाठीचा सूक्ष्म आराखडा माझ्याकडे आहे, त्याची अंमलबजावणी आपण करावी आणि पुण्यात ‘वन टाईम टॅक्स’पद्धत आणावी, असे आवाहन केले.
बावनकुळे म्हणाले की, पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा आपण केलेले कार्य हेच कायम राहत. शिवाय महालक्ष्मीच्याच दर्शनाला यायचे होते म्हणून वेळात वेळ काढून मी येथे आलो. मी येथे राजकीय बाेलणार नाही, पण आबा आपल्याला आणि परिवाराला आई जगदंबा उदंड आयुष्य देईल, अशी प्रार्थना करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी २८ टक्के वरून ५ टक्के करत देशाला मोठी गिफ्ट दिली आहे. सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय लाेकांचेही कल्याण करत आहे. माेदी यांनी दिलेला स्वदेशीचा मूलमंत्र २०४७ चा भारत घडवेल. - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री