मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोहगड किल्ल्याला अचानक भेट; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:44 IST2025-11-12T13:44:20+5:302025-11-12T13:44:56+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोहगड परिसराचा इतिहास, पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व आणि स्थानिकांच्या विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोहगड किल्ल्याला अचानक भेट; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
पवनानगर: जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज दि.१२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भेट दिली. आजचा दिवस ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसाठी अविस्मरणीय ठरला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खाजगी दौऱ्यातील काही क्षण काढत लोहगड किल्ल्याला आणि परिसरातील ग्रामस्थांना भेट दिली. याप्रसंगी लोहगड ग्रामस्थांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनापासून स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोहगड परिसराचा इतिहास, पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व आणि स्थानिकांच्या विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी लोहगड-विसापूर विकास मंचाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांना मंचाच्या उपक्रमांची आणि स्थानिकांच्या विकासाच्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. मंचाच्या कार्यकर्त्यांसाठी ही भेट एक सुवर्णक्षण ठरली असून, भविष्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळ दिल्यास लोहगड पायथ्याशी भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. या अचानक भेटीने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लोहगड परिसरात विकासाच्या नव्या शक्यता खुल्या होतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.