ओढ्यात कार पलटी होऊन चक्काचूर; केडगाव–चौफुला रोडवर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:31 IST2025-12-21T18:31:16+5:302025-12-21T18:31:39+5:30
केडगाव–चौफुला दरम्यान प्रवास करत असताना त्यांच्या कारचा ताबा सुटून वाहन थेट बोरमलनाथ ओढ्यात पलटी झाले

ओढ्यात कार पलटी होऊन चक्काचूर; केडगाव–चौफुला रोडवर भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू
केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव–चौफुला रस्त्यावर रविवारी दुपारी ३ च्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात केडगाव येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. बोरमलनाथ ओढ्यात कार पलटी झाल्याने वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून अपघाताची तीव्रता स्पष्ट दिसून येते. या अपघातात सार्थक बारवकर (रा. केडगाव) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर सार्थक कडू हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चौफुला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती केडगाव पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वाघज यांनी दिली.
सार्थक बारवकर व सार्थक कडू हे दोघेही एकत्र शिक्षण घेत होते आणि जिवलग मित्र होते. केडगाव–चौफुला दरम्यान प्रवास करत असताना त्यांच्या कारचा ताबा सुटून वाहन थेट बोरमलनाथ ओढ्यात पलटी झाले. अपघाताची माहिती मिळताच केडगाव व परिसरातील नागरिकांनी चौफुला येथील रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. या दुर्दैवी घटनेमुळे केडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून तरुण मित्राच्या अकाली निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.