पुणे : शहरातील नाना पेठ, सॅलिसबरी पार्क आणि धायरी परिसरातील लॉन्ड्रीचे दुकान आणि दोन फ्लॅट फोडून ६ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाना पेठेतील सुनील सोनटक्के यांच्या लॉन्ड्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समर्थ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ डिसेंबर रोजी घडला.
घरफोडीची दुसरी घटना सॅलिसबरी पार्क परिसरात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शीला सुशील जैन (५७) यांनी फिर्याद दिली. ही घटना १८ डिसेंबर रोजी दुपारी दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी जैन यांच्या फ्लॅटमधून ४ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले आहेत. फिर्यादी जैन यांचा सॅलिसबरी पार्क येथील मार्बल हाऊस अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने चोरी करून पळ काढला. फिर्यादी यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक कस्पटे तपास करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत बेनकर वस्ती, धायरी येथील गणेश भिकू कदम (४९) यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी १ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून पोबारा केला. हा प्रकार १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत घडला आहे. फिर्यादी यांच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा कशाच्या तरी साह्याने कट करून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील दागिने चोरी केले. पुढील तपास पोलिस हवालदार काकडे करत आहेत.