पुणे : मौजमजा करण्यासाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना समर्थ पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली आहे. ही चोरी ५ जुलै रोजी नाना पेठेतील एका कलर दुकानात घडली होती. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून १५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सुजल राजन परदेशी (२०, रा. शिवाजी स्टेडिअम समोर, २१७ मंगळवार पेठ), सुभाष राजेश सरोज (२१, रा. शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ), नितीन दिलीप सरोज (२२) आणि रोहित मुन्नालाल सरोज (२२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
घरफोडी गुन्ह्याच्या अनुषंगाने समर्थ पोलिस तपास करत असताना पोलिस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख यांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने चोरी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी मौजमजेसाठी शनिवारी कलर दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते, पोलिस निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलिस अंमलदार पागार, रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे आणि भाग्येश, यादव यांनी केली.