Bribe Case : तलाठ्यासाठी लाच घेणाऱ्या एकाला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:40 IST2025-01-16T09:40:26+5:302025-01-16T09:40:30+5:30
हडपसर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल

Bribe Case : तलाठ्यासाठी लाच घेणाऱ्या एकाला पकडले
पुणे : सातबारा उताऱ्यावरील नोंदीसाठी तलाठ्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. फुरसुंगीतील तलाठी कार्यालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ठकसेन ऊर्फ तुषार मारुती गलांडे (वय ४२, रा. नारायणनगर, फुरसुंगी, हडपसर) याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एकाने जमीन खरेदी केली होती.
तक्रारदारांना मिळकती संदर्भातील फेरफार आणि सातबारा नोंदणीचे काम शासकीय पत्राद्वारे तक्रारदारांना देण्यात आले आहे. या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करत होते. तक्रारदार फुरसुंगी येथील तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी तलाठी कार्यालयात वावर असलेला दलाल आरोपी ठकसेन गलांडे याने तलाठ्याकडून सातबारा उताऱ्यावर नोंदीचे काम करून देतो. त्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदाराला सांगितले.
तक्रारदाराने तडजोडीत पाच हजार रुपये लाच देण्याचे मान्य करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. बुधवारी (दि.१५) दुपारी तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून तलाठ्यासाठी लाच घेणाऱ्या गलांडे यास ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अमोल भोसले करत आहेत.