नव्या बसमध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्र; चालक मद्यपान केल्याचे दिसून आल्यास बस सुरू होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:53 IST2025-10-31T09:53:04+5:302025-10-31T09:53:12+5:30
बसचे काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून बस चालवतात. तसेच, प्रवाशांसोबत गैरवर्तनदेखील करतात

नव्या बसमध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्र; चालक मद्यपान केल्याचे दिसून आल्यास बस सुरू होणार नाही
पुणे: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात पुढील वर्षात नव्या बस दाखल होणार आहेत. या बसमध्ये चालकाजवळ ब्रेथ ॲनालायझर यंत्र बसविण्यात येणार आहे. चालकाला बस सुरू करण्यापूर्वी चाचणी द्यावी लागणार आहे. यामध्ये चालकाने मद्यपान केल्याचे दिसून आल्यास ती सुरू होणार नाही. ही नवी यंत्रणा सर्व बसमध्ये बसवावी, अशा अटी व करार करून नव्या बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे मद्यपी चालकांना अटकाव बसणार असून, प्रवाशांची सुरक्षितता वाढणार आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून दररोज ६० लाखांच्या पुढे नागरिक प्रवास करतात. गावखेड्यापासून ते शहरापर्यंत सुरक्षित सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु, काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून बस चालवतात. तसेच, प्रवाशांसोबत गैरवर्तनदेखील करतात. त्यामुळे अपघात होऊन प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे एसटी महामंडळाकडून सतत तपासणी मोहीम राबवली जाते. मद्यपान केलेल्या चालकांवर कारवाई केली जाते. तरीही या घटना थांबण्यास तयार नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यापुढे येणाऱ्या प्रत्येक नवीन बसमध्ये चालकाजवळ ब्रेथ ॲनालायझर यंत्र बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन बस खरेदी करताना करारामध्ये ही अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे एसटीच्या नवीन बसमध्ये हे यंत्र असणार आहे.
आठ हजार बस घेण्याची प्रक्रिया लवकरच राबविणार
एसटी महामंडळाच्या ताफ्यात पुढील पाच वर्षांत २५ हजार बस दाखल होणार आहेत, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी लवकरच आठ हजार बस घेण्याची प्रक्रिया राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात येणाऱ्या एसटीच्या सर्व बसमध्ये ब्रेथ ॲनालायझर यंत्र असणार आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात १४ हजार बस असून, त्यापैकी १२ हजार ५०० बस मार्गावर धावतात.