क्षुल्लक कारणावरून वृद्धाची जीभ तोडून खून करणाऱ्यास दोन तासात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 18:43 IST2019-02-25T18:42:22+5:302019-02-25T18:43:34+5:30
वृद्धाला क्षुल्लक कारणावरून मारहाण करून त्या वृद्धाची जीभ तोडून त्याचा खून करून फरार असलेल्या आरोपीला लोणीकंद पोलिसानी सापळा रचून दोन तासांत जेरबंद केले.

क्षुल्लक कारणावरून वृद्धाची जीभ तोडून खून करणाऱ्यास दोन तासात अटक
पुणे : कोलवडी (ता. हवेली) येथील वृद्धाला क्षुल्लक कारणावरून मारहाण करून त्या वृद्धाची जीभ तोडून त्याचा खून करून फरार असलेल्या आरोपीला लोणीकंद पोलिसानी सापळा रचून दोन तासांत जेरबंद केले. सुरेशकुमार शिवशरण पासवान (वय २२ वर्षे, रा. उंद्रे वस्ती, मूळगाव- पखरौली फतेहपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुकाराम निवृत्ती साळुंके (वय ७०, कोलवडी ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ व क्षुल्लक कारणावरून सुरेशकुमार पासवान याने दारू पिऊन येऊन लाथाबुक्क्यांनी, पोटात, तोंडावर, छातीवर मारहाण करून, त्यांची जीभ तोडून व जिवे मारून पळून गेल्याची तक्रार दिली होती. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. आरोपी सुरेशकुमार पासवान यास गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ दोन तासांमध्ये पकडण्यात यश मिळवले.
याकामी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेली उप विभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, संतोष कुलथे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, सूरज वळेकर, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव सस्ते हे करीत आहेत.