स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:27 IST2025-08-08T17:26:10+5:302025-08-08T17:27:15+5:30
जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचा निर्णय
पुणे : निवडणुकांपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, अशी घोषणा केली होती. ती अद्यापही अमलात आणली नाही. शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलन करू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, शेतकरी विभागला जाऊ नये, यासाठी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रहार पक्ष बहिष्कार टाकेल, अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. जात, धर्माच्या आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जाईल, मतांसाठी विरोध होईल, या कारणामुळेच या निवडणुका लढण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात शुक्रवारी आयोजित शेतकरी हक्क परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार कैलास पाटील, बाळासाहेब देशमुख, शेतकरी नेते अजित नवले, अनिल घनवट, पत्रकार रमेश जाधव उपस्थित होते.
डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा बच्चू कडू यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पुण्यात झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत या संदर्भात कडू यांनी घेतलेली भूमिका राजू शेट्टी यांनी मात्र पुढील बैठकीत विचार करूनच मांडू, असे स्पष्ट केले. मात्र, त्यावर कडू यांनी आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कडू यांनी यापूर्वी रायगड आणि मोझरी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या शेतकरी संघटना पुण्यातील या शेतकरी हक्क परिषदेच्या निमित्ताने एकत्रित आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यात येणाऱ्या लढाई शेतकऱ्यांची मते विभागली जाऊ नयेत. त्यामुळेच या निवडणुकांवर बहिष्कार टाकावा का, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर कार्यकर्त्यांनी होकार देत त्याला सहमती दर्शवली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जात, धर्मावरच प्रचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणत्याही सत्ताधारी पक्षाला निवडणूक लढवायची नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील तरुणांना मतांसाठी तोडले जाईल. त्याला शेतकरी बळी पडतील. सध्याचे राजकारण वाहत गेले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित होण्याची गरज असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. राजकारण्यांना मतदाराची भीती कायम असते. त्यामुळे बहिष्कारचे ब्रह्मास्त्र वापरणे आपल्या हाती असल्याचे कडू यांनी यावेळी स्पष्ट केले.