मृतदेह ३ दिवस घरातच लपवून ठेवला; अर्धवट जळालेल्या 'त्या' महिलेच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:08 IST2025-11-19T17:02:35+5:302025-11-19T17:08:17+5:30
रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह तब्बल २० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्याचे लग्न मोडले असून दोन मुले आहेत

मृतदेह ३ दिवस घरातच लपवून ठेवला; अर्धवट जळालेल्या 'त्या' महिलेच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य उघड
लोहगाव: लोहगाव स्मशानभूमी जवळील गुरुद्वारा कॅालनी परिसरात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य उघड झाले आहे. महिलेचा खून तिच्याच प्रियकराने वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. खून झाल्यानंतर आरोपीने मृतदेह तब्बल तीन दिवस घरातच लपवून ठेवला होता. घरात व परिसरात दुर्गंधी वाढत असल्याने बिंग उघडेल म्हणून आरोपी मुलाने वडिलांच्या मदतीने मृतदेह रिक्षात टाकून मंगळवारी पहाटे लोहगावात फेकून दिला.
सुवर्णा रहा आणि आरोपी रवी साबळे हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. १४ नोव्हेंबर रोजी किरकोळ घरगुती वादातून त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले. या वादाच्या दरम्यान झालेल्या मारहाणीमुळे सुवर्णा यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले होते. विमानतळ पोलिसांच्या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयास्पद रिक्षाचा मागोवा घेतला. लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी व येरवडा परिसरात चौकशी केल्यानंतर तपास पथक थेट येरवड्यातील यशवंतनगर भागात पोहोचले आणि अचूक माहितीच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. अवघ्या सहा तासांत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन प्रकरणाचा गुन्हा उघडकीस आणला. रवी रमेश साबळे (वय ३०) आणि त्याचे वडील रमेश साबळे (वय ६३, रा. यशवंतनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खून झालेल्या महिलेचे नाव सुवर्णा (पूर्ण तपशील उपलब्ध नाही) आहे. मंगळवारी सकाळी लोहगाव स्मशानभूमीजवळ तिचा कुजलेल्या, जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.
तपासात उघड झाले की, रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह तब्बल २० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचे लग्न मोडले असून दोन मुले आहेत. वडील रमेश साबळे हे रिक्षाचालक आहेत. प्राथमिक तपासानुसार खुनाची घटना येरवडा परिसरातील असल्याने पुढील गुन्ह्याचा तपास येरवडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व निरीक्षक (गुन्हे), शरद शेळके यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने उलगडा केला.