LPG Gas Crisis: पिंपरी चिंचवडमध्ये गॅस टंचाईमुळे सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती २५००, तर व्यावसायिक ८ हजारांपर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:56 IST2026-03-16T13:56:08+5:302026-03-16T13:56:31+5:30
विशेषतः हॉटेल, खानावळी आणि हातगाडीधारकांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी गॅसची तातडीची गरज असल्याने ते जास्त दर मोजूनही सिलिंडर खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत

LPG Gas Crisis: पिंपरी चिंचवडमध्ये गॅस टंचाईमुळे सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती २५००, तर व्यावसायिक ८ हजारांपर्यंत
पिंपरी : आखाती युद्धजन्य परिस्थितीमुळे पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिक गॅस पुरवठा सध्या बंद आहे, तर घरगुती गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. याचाच फायदा घेत काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाल्याचे शुक्रवारी (दि. १३) कासारवाडी येथे पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईवरून समोर आले आहे. नागरिकांसह हॉटेल व्यावसायिक आणि हातगाडीधारक मिळेल, त्या किमतीत सिलिंडर खरेदी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या घरगुती गॅस सिलिंडरचीही टंचाई जाणवत आहे. ९१९ रुपयांना मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर काळ्या बाजारात तब्बल २५०० रुपयांपर्यंत विकला जात आहे, तर १८९६ रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर ५ हजार ते ८ हजार रुपयांवर गेले आहेत. नियमित पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक नागरिकांना सिलिंडर मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा बंद असल्याने व घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने काहीजण अनधिकृत मार्गाने सिलिंडर विक्री करत असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः हॉटेल, खानावळी आणि हातगाडीधारकांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी गॅसची तातडीची गरज असल्याने ते जास्त दर मोजूनही सिलिंडर खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. घरात स्वयंपाकासाठी पर्याय नाही. त्यामुळे जास्त पैसे देऊनही सिलिंडर घ्यावा लागत आहे. -एक गृहिणी, लांडेवाडी भोसरी.
हॉटेल व्यवसाय पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहे. गॅस मिळाला नाही, तर दुकान बंद ठेवण्याची वेळ येते. त्यामुळे मिळेल त्या दरात सिलिंडर खरेदीसाठी व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. काळ्याबाजारात व्यावसायिक सिलिंडर ५ ते ६ हजारांना मिळत असल्याची चर्चा आहे. सिलिंडरचा काळाबाजर तातडीने राेखावा. -विशाल दांगट, सामाजिक कार्यकर्ते.
गॅस सिलिंडरबाबत पुरवठा विभागाकडे २१ तक्रारी
गॅस सिलिंडरबाबत नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभानिहाय तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे. या कक्षांकडे रविवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाचपर्यंत घरगुती सिलिंडरबाबत २१ नागरिकांना तक्रारी केल्या. ऑनलाइन बुकिंग करूनदेखील गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारींचाच यात समावेश होता. सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या नाहीत. तक्रारी प्राप्त झाल्यास तत्काळ तपासणी करून कारवाई केली जाईल, असे पुरवठा निरीक्षक चैताली गायकवाड यांनी सांगितले.