पुणे महानगरपालिकेच्या ‘दांडी’बहाद्दर २७ नगरसेवकांना भाजपाने धाडल्या नोटीसा; मागविले खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 06:46 PM2021-02-19T18:46:24+5:302021-02-19T18:47:37+5:30

सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणे भोवले...

BJP issues notices to 27 ubsent corporators of Pune Municipal Corporation; Requested Disclosures | पुणे महानगरपालिकेच्या ‘दांडी’बहाद्दर २७ नगरसेवकांना भाजपाने धाडल्या नोटीसा; मागविले खुलासे

पुणे महानगरपालिकेच्या ‘दांडी’बहाद्दर २७ नगरसेवकांना भाजपाने धाडल्या नोटीसा; मागविले खुलासे

Next

पुणे : ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या  27 नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. हे सर्व नगरसेवक भाजपाचेच असून गैरहजर राहण्यामागील कारणांचा खुलासा करावा असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेची खास सभा तसेच पर्यावरणाची तहकूब सभा गुरूवारी (दि. १८) आयोजित करण्यात आली होती. या सभेला उपस्थित राहावे यासाठी नगरसचिव कार्यालयाच्या वतीने टपाला द्वारे कार्यपत्रिका पाठविण्यात आली होती. तसेच सभागृह नेता कार्यालयामार्फत प्रत्येक नगरसेवकाला फोन करून सभेला उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आलेले होते. परंतु, २७ सभासदांनी  ‘दांडी’ मारली. वारंवार आठवण करूनही अनुपस्थित राहिलेल्या या सर्व सभासदांना नोटीस बजावित सभागृह नेता गणेश बीडकर यांनी खुलासा मागितला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट यांच्यासह सभागृह नेता कार्यालयाकडे हा खुलासा द्यावा, असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

कोरोनामुळे वर्षभरापासून सर्वसाधारण सभा न झाल्याने ३०० हून अधिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या नगरसेवकांचा याला विरोध असतानाही भाजपने ऑनलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अधिकाधिक विकासकामे होणे हे भाजपाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. या विकासकामांच्या विषयांना सर्वसाधारणसभेची मान्यता आवश्यक आहे.
विरोधी पक्षांकडून विषयांना विरोध झाल्यास बहुमताच्या जोरावर विषय मान्य करावे लागतात. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक सभासदाने हजर राहावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये देखील मार्गदर्शन करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सभागृहात हजर राहत नागरिकांच्या हितासाठी कसे प्रश्न उपस्थित करायचे, याचे मार्गदर्शन केले होते. तरीदेखील नगरसेवक गैरहजर राहात असल्याची गंभीर दखल पक्षाने घेतली आहे.
====
  ‘दांडी’ बहाद्दरांमध्ये पदाधिकारीच अधिक
सभेला दांडी मारणा-यांमध्ये पदाधिकारीच अधिक असून विविध महत्वाच्या समित्यांवर सदस्य, अध्यक्ष तसेच स्थायी समितीमध्ये काम करणारे आजी, माजी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील सर्वात अधिक सभासदांनी या सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवली.
====
पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या. पालिका आयुक्तांनी मिळकत करात सुचविलेली वाढ फेटाळून पुणेकर नागरिकांना दिलासा देण्यासाठी गुरुवारी खास सभा बोलाविण्यात आली होती. पक्षाच्या शिस्तीचे पालन न केलेल्या २७ सभासदांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
- गणेश बीडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

Web Title: BJP issues notices to 27 ubsent corporators of Pune Municipal Corporation; Requested Disclosures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.