भाजपला काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय एकही निवडणूक लढवता येत नाही - हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:04 IST2025-08-11T18:03:41+5:302025-08-11T18:04:02+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांनी थोडे मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री काँग्रेस पक्षातून घेतलेलेच आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल

BJP cannot contest any election without taking Congress leader into the party Harshvardhan Sapkal | भाजपला काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय एकही निवडणूक लढवता येत नाही - हर्षवर्धन सपकाळ

भाजपला काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय एकही निवडणूक लढवता येत नाही - हर्षवर्धन सपकाळ

पुणे: काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करणारा भारतीय जनता पक्ष काँग्रेसयुक्त झाला आहे. काँग्रेसचा नेते पक्षात घेतल्याशिवाय त्यांना एकही निवडणूक लढवता येत नाही, हीच वस्तुस्थिती आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजप मतांवर डल्ला मारत आहेत. विधानसभा निवडणुकीत मतांची अशी चोरी करूनच ते सत्तेवर आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

खडकवासल्यात पक्षाने आयोजित केलेल्या दोनदिवसीय पदाधिकारी कार्यशाळेच्या उद्घाटनाआधी पत्रकारांबरोबर संवाद साधताना सपकाळ यांनी भाजपला लक्ष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसला गळती लागली, हा विरोधकांचा कांगावा आहे. काँग्रेस पक्ष हा विचारधारा असलेला पक्ष आहे. या विचारधारेला धुडकावून लावणारे नेते पक्षाला नकोच आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडे मागे वळून पाहिले तर अर्ध्याहून अधिक मंत्री काँग्रेस पक्षातून घेतलेलेच आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. ही भाजपची शोकांतिका आहे.

तुमच्याकडे १ कोटी कार्यकर्ते असल्याचे सांगता, तर मग नेते कशासाठी आयात करता? असा प्रश्न सपकाळ यांनी भाजपला केला. राज्य सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत आहेत, याचे उदाहरण देताना माजी मंत्री सतेज पाटील यांनी ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स जोडण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयाबाबत सांगितले. याचा भार शेतकऱ्यांवरच पडणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या सरकारमध्ये सत्तेचा हावरटपणा सुरू असल्याची टीका केली.

कबुतरखाना...

मुंबईत सुरू असलेल्या कबुतरखान्यावरही सपकाळ यांनी भाष्य केले. कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे, तसाच नागरिकांनाही जगण्याचा अधिकार आहे. तज्ज्ञ काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कबुतरखाने मतांसाठी म्हणून वाचवत आहे, अशी टीका त्यांनी केली. नागरिकांना कबुतरांमुळे होत असलेल्या जीवघेण्या आजारांचा सरकारने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

Web Title: BJP cannot contest any election without taking Congress leader into the party Harshvardhan Sapkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.