पुण्यात दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची पुन्हा सत्ता; निवडणुकीनंतर अजित पवारांशी युती नाही - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:55 IST2025-12-19T12:54:53+5:302025-12-19T12:55:40+5:30
कोणाशी आघाडी करायची हा अजित पवार व त्यांच्या पक्षाचा व्यक्तिगत प्रश्न असून या प्रयोगाचा राज्यातील सत्तेवर कसलाही परिणाम होणार नाही

पुण्यात दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची पुन्हा सत्ता; निवडणुकीनंतर अजित पवारांशी युती नाही - चंद्रशेखर बावनकुळे
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी परस्पर विरोधी लढणार आहेत. भाजपने आजवर केलेल्या कामाच्या जोरावर दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर या दोन महापालिकांमध्ये अजित पवार यांची साथ घेण्याची किंवा त्यांच्याशी युती करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुणे प्रेस क्लबसाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने गुरुवारी कृतज्ञता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी चेतनानंद गावडे महाराज, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील, पांडूरंग सांडभोर, मंगेश फल्ले, उमेश शेळके, सुनित भावे, अंजली खमितकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील महापालिकांची निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना युतीच्या माध्यमातून लढणार आहे. या युतीपासून अजित पवार यांना दूर ठेवण्यात आल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
बावनकुळे म्हणाले, कोणाशी आघाडी करायची हा अजित पवार व त्यांच्या पक्षाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा प्रयोग स्थानिक आहे. त्यामुळे या प्रयोगाचा राज्यातील सत्तेवर कसलाही परिणाम होणार नाही. आम्ही आणि अजित पवार आमने सामने लढलो तरी आमच्यात कटुता येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. भाजपने शहरात केलेल्या कामाच्या बळावर दोन्ही महापालिकांमध्ये भाजप शिवसेना युतीला यश मिळेल. त्यामुळे निवडणुकीनंतर पुण्यात अजित पवारांची साथ घेण्याची वेळच आमच्यावर येणार नाही. काही पक्ष प्रवेशांना स्थानिक आमदारांचा विरोध असेल, तर त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. शेवटी संसदीय राजकारणात आकड्यांना महत्त्व असते. अपेक्षित आकडा गाठण्यासाठी काही पक्षप्रवेश करावे लागतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.