पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, हा आरोपी कुरिअर बॉय नसून पीडित तरुणीचा मित्रच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पीडितेने तक्रार देताना ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवली होती. तसेच या घटनेमध्ये बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नसल्याचे देखील समोर आले आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलमध्ये काढलेला सेल्फी संबंधित तरूणीनेच एका अॅपच्या माध्यमातून एडिट करुन त्याखाली मेसेजही तिनेच लिहिला असल्याचे उघड झाले आहे. तशी कबुली देखील तरुणीने पोलिसांना दिली आहे.
मात्र, तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या म्हणण्यावर ती ठाम असल्याने, पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे तरुणीने बोलवल्यानंतरच आपण तिच्या घरी गेल्याचा दावा या तरुणाने केला आहे. संगणक अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत काही संघटनांनी आंदोलनही केले होते. तर पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत तब्बल २२ पथके दिवस-रात्र तपासासाठी नेमली होती.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेला आरोपी एका मल्टी नॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. तो मागील एका वर्षापासून तरुणीच्या संपर्कात आहे. दोघांचा परिचय त्यांच्या समाजाच्या समाज मेळाव्यात झाला होता. त्यांचे एकमेकांशी फोनवर तसेच सोशल मीडियाद्वारे सातत्याने संपर्कात आहेत. तसेच तरुणाचे पीडितेच्या घरीही येणे-जाणे होते. तांत्रिक तपासात तो बाणेर येथील त्याच्या राहत्या घरातून तरुणीला फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून अनेकदा खाद्यपदार्थ ऑर्डर करुन पाठवत होता. घटनेच्या दिवशी तो सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याचे छायाचित्र पोलिसांनी दाखवल्यावर पीडितेने मात्र त्याला ओळखत नसल्याचे सांगितले. तिने असे का सांगितले? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. तो तिच्या सदनिकेत सव्वा सातच्या सुमारास जाताना दिसत आहे. तर सदनिकेतून पावणे नऊच्या सुमारास बाहेर पडत आहे. तो बाहेर पडल्यावर सेल्फी एडिट केल्याचे आणि त्याखाली ‘मै वापस आउंगा’ असा मेसेज लिहिल्याचे तांत्रिक तपासात उघड झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तरुणीच्या सांगण्यानुसारच तिच्या घरी आला होता. दोघांच्या संभाषणाचे काही व्हॉट्सअप चॅटिंग देखील तरुणाच्या मोबाईलमधून पोलिसांना मिळाले आहे.
ससूनमध्ये ती दीड मिनिटे स्तब्ध अन् पोलिसांनी हेरलं..
गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक आणि त्यांच्या पथकाने तरुणीच्या घरी आलेल्या तरुणाचा छडा लावला. त्याचा फोटो शोधून काढला. वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनासाठी तरुणीला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी देखील तेथे उपस्थित होत्या. तरुणीला तरुणाचा फोटो ज्यावेळी पोलिसांनी दाखवला त्यावेळी तिने दीड मिनिटे पॉझ घेतला. तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला असा सवाल तीने पोलिसांना केला. त्यानंतर हा तो व्यक्ती नाही असे तिने सांगितले. त्याचवेळी एसीपी मुळीक यांच्या नजरेनं तिचे खोटं बोलणं हेरलं होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली.
कोंढवा ते बाणेर ५०० सीसीटीव्ही कॅमेरे..
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांसमोर देखील खर्या अर्थाने या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले होते. दिवस-रात्र ५०० पोलिसांनी तपास करून अखेर तिच्या घरी आलेल्या तरुणाला शोधून काढले. त्यासाठी कोंढव्यातील त्या सोसायटीच्या गेटपासून ते बाणेर पर्यंतच्या परिसरातील तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. तरुणीच्या घरी आलेल्या तिच्या मित्राचा फोटो सोसायटीतील कॅमेर्यात कैद झाला होता. त्याच फोटोचा धागा पकडून पोलिसांनी त्या तरुणाला शोधून काढले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे ज्या दिवशी तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याचा दावा केला, त्या दिवशी तो तरुण तिच्या सोसायटीत आल्याचे निष्पन्न झाले.
सोसायटीतील ४४ सदनिका धारकांचे जबाब नोंदवले..
पोलिसांनी तरुणी राहत असलेल्या सोसायटीमधील सर्व रहिवाशांना तरुणाचा फोटो दाखवला. अशा प्रकारची व्यक्ती आपल्या कोणाच्या घरी त्या दिवशी आली होती का? अशी विचारणा केली. त्यावेळी ४४ सदनिका असलेल्या सोसायटीतील लोकांनी ही व्यक्ती आपल्या कोणाच्या घरी आली नसल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तरुणीच्या घरी हाच तरुण आल्याचे शिक्कामोर्तब केले. गुरूवारी रात्रभर सदनिका धारकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले.
अन् पोलिस यंत्रणा लागली कामाला..
तरुणीने मध्यरात्री पोलिस ठाण्यात येत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. मंगळवारी (दि. २) मध्यरात्री अपर पोलिस आयुक्त, उपायुक्त पोलिस ठाण्यात आले. गुन्हे शाखेचे २०० आणि परिमंडळ ५ चे ३०० पोलिस दिवस-रात्र कामाला लागले. एकीकडे शहरात अति महत्वाच्या व्यक्तींचा दौरा असताना, पोलिस आयुक्तांनी काही अधिकार्यांना याच गुन्ह्यांच्या छडा लावण्यासाठी कामाला लावले होते. एवढेच नाही तर स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन दिवस कोंढवा पोलिस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण तपासाची माहिती घेतली.
तपास अद्यापही पूर्ण झालेला नाही, पीडितेचा जबाब नोंदवला जात आहे. सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत. आरोपी आमच्या ताब्यात आहे. पीडितेचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेश केले जात आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त