१ लाख न दिल्यास माती वाहतूक करू दिली जाणार नाही; भोरची महिला मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:57 IST2025-12-05T19:57:03+5:302025-12-05T19:57:17+5:30
माती वाहतूक करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास माती वाहतूक करू दिली जाणार नाही, अशी धमकीही दिली होती.

१ लाख न दिल्यास माती वाहतूक करू दिली जाणार नाही; भोरची महिला मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात
पुणे : माती वाहतुकीसाठी दीड लाखाची लाच मागून एक लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भोरमधील निगुडघर येथील महिला मंडलाधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले. रुपाली अरुण गायकवाड (४०, रा. वेताळ पेठ, भोर, जि. पुणे) असे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या मंडल अधिकारी महिलेचे नाव आहे. तक्रारदार २३ वर्षांचा तरुण व्यावसायिक आहे. त्याने भोर तहसील कार्यालयाकडून १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीसाठी २०० ब्रास माती वाहतुकीचा परवाना घेतला होता. त्यापोटी त्याने १ लाख २६ हजार २३० रुपये ‘राॅयल्टी’ भरली होती.
परवाना मिळाल्यानंतर माती वाहतूक सुरू केली होती. मात्र, निगुडघर येथील मंडलाधिकारी रुपाली गायकवाड यांंनी ३० नोव्हेंबर रोजी माती वाहतूक करणाऱ्या गाड्या अडविल्या. त्यांनी माती वाहतूक करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. पैसे न दिल्यास माती वाहतूक करू दिली जाणार नाही, अशी धमकीही दिली होती.
त्यानंतर तक्रारदार तरुणाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपतच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी गुरुवारी दुपारी भोर परिसरातील अभिजीत मंगल कार्यालयाजवळ सापळा लावला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास गायकवाड यांना भोरेश्वरनगर रस्ता परिसरात तक्रारदाराकडून एक लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भोर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिमान्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने केली. पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे तपास करत आहेत.