Mahashivratri 2026: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद; महाशिवरात्रीलाही दर्शन नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:15 IST2026-02-13T17:14:10+5:302026-02-13T17:15:57+5:30
भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे

Mahashivratri 2026: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद; महाशिवरात्रीलाही दर्शन नाही
पुणे : पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर यांच्या सर्वांगीण विकासाचे काम वेगात सुरू आहे. भाविकांसाठी सुरक्षित, सुयोग्य आणि सुसज्ज सुविधा निर्माण करण्यासाठी विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आली असून, या कामांदरम्यान मंदिर पुढील तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या महाशिवरात्रीलाही मंदिर दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती जितेंद्र डुडी यांनी दिली.
राज्य सरकारने श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा’ या विशेष आराखड्यास मंजुरी दिली आहे. या आराखड्यांतर्गत नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यात येत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
सध्या सुरू असलेल्या बांधकामाच्या स्वरूपाचा, परिसरातील भौगोलिक परिस्थितीचा आणि भाविकांच्या मोठ्या संख्येचा विचार करता, काम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता अबाधित राखणे आणि विकासकामे नियोजित कालमर्यादेत पूर्ण करणे या उद्देशाने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीचा कालावधी (दि. १२ ते १८ फेब्रुवारी) वगळण्यात आला होता. मात्र, कामाचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षेच्या बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर या कालावधीतही मंदिर खुले ठेवणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पूर्वीच्या निर्णयात बदल करत महाशिवरात्रीलाही मंदिर बंद ठेवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
“भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे,” -जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी