दिवाळीनिमित्त भिडे पूल येत्या शनिवारपासून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुला राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:54 IST2025-10-09T19:53:46+5:302025-10-09T19:54:37+5:30
दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात पेठांच्या परिसरात खरेदीसाठी येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा पूल खुला करण्यात आला आहे

दिवाळीनिमित्त भिडे पूल येत्या शनिवारपासून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुला राहणार
पुणे: दिवाळी सणानिमित्त होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारपासून भिडे पूल सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीला पुन्हा खुला करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.
मेट्रोच्या डेक्कन येथील स्टेशनला प्रवाशांना येता यावे यासाठी नारायण पेठेच्या दिशेला पादचारी पूल बांधण्यात येत आहे. या पादचारी पुलाचे काम सुरु असताना भिडे पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांना धोका होऊ नये, म्हणून भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मेट्रोने कामासाठी ४५ दिवस मागितल्याने भिडे पूल ४५ दिवस बंद ठेवण्यात आला होता. तरीही काम पूर्ण न झाल्याने त्याची मुदत वाढवली होती. गणेशोत्सवात १५ दिवस काम बंद ठेवून भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी मेट्रोला काम पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवून दिली होती. ही मुदत १० ऑक्टोबर रोजी संपत आहे.
शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठ, नारायण पेठ ते डेक्कन जिमखाना परिसराला जोडणारा भिडे पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी केली जात होती. दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात पेठांच्या परिसरात खरेदीसाठी येतात. त्यातच हा पूल सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नदीपात्रातील रस्त्यांवर फटाके स्टाॅलही आता सुरू होतील. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पेठ भागात आणि नदीपात्रातील रस्त्यावर खूप वाहतूक कोंडी होऊ शकते. भिडे पुलावरून वाहतूक सुरू झाली तर परिस्थिती थोडी सुसह्य होईल. या सर्व गोष्टीचा विचार करून आता हा पूल वाहतुकीसाठी सुरू ठेवल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.