ढेकणांचा सुळसुळाट; लोकमतच्या वृत्तानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग, वसतिगृहांची औषध फवारणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:27 IST2025-04-28T13:26:08+5:302025-04-28T13:27:16+5:30
ढेकणांमुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची झाेपमाेड हाेऊन शैक्षणिक नुकसान होणार हाेते, त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात हाेती

ढेकणांचा सुळसुळाट; लोकमतच्या वृत्तानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग, वसतिगृहांची औषध फवारणी
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ढेकणांनी जगणे कठीण करून साेडले आहे. ऐन परीक्षेच्या काळात हा त्रास तीव्र झाल्याने विद्यार्थ्यांची झाेपमाेड झाली आहे, तसेच परीक्षेचा ताणही वाढला आहे. याबाबतची व्यथा विद्यार्थ्यांनी ‘लाेकमत’कडे मांडली आणि ‘ढेकूनमामा ऐक सांगताे... कुणी माझ्या बुटात लपलंय रं, अन् कुणी माझ्या खिशात बसलंय रं’ अशा शीर्षकाचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर यंत्रणेला जाग आली. तातडीने सर्व वसतिगृहांची पाहणी करून औषध फवारणीसह आवश्यक उपाययाेजनादेखील सुरू केल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या ढेकणांचा एवढा सुळसुळात झाला आहे की, त्रस्त विद्यार्थ्यांवर वसतिगृह सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. त्रस्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची झाेपमाेड हाेऊन शैक्षणिक नुकसान होणार हाेते. त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात हाेती. वृत्त प्रसिद्ध हाेताच कार्यवाही सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच सह्यांचे पत्रदेखील विद्यापीठ प्रशासनाला सादर केले आहे.
‘लाेकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने संपूर्ण वसतिगृहांत स्वच्छता केली आहे. पेस्ट कंट्रोलदेखील केले जात आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल ‘लाेकमत’चे आणि विद्यापीठ प्रशासनाचेही आभार. - शिवा बाराेळे, विद्यार्थी