‘रेकाॅर्डब्रेक’ मतांचा पाऊस पाडून बारामतीकरांची अनोखी श्रद्धांजली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 07:35 IST2026-05-05T07:34:41+5:302026-05-05T07:35:05+5:30

‘अजितदादां’चे ‘गारुड’ कायम

Baramatikars pay unique tribute by pouring in 'record-breaking' votes; Deputy Chief Minister Sunetra Pawar wins by 2 lakh 18 thousand 930 votes | ‘रेकाॅर्डब्रेक’ मतांचा पाऊस पाडून बारामतीकरांची अनोखी श्रद्धांजली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजयी

‘रेकाॅर्डब्रेक’ मतांचा पाऊस पाडून बारामतीकरांची अनोखी श्रद्धांजली; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजयी

बारामती : बारामतीकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना तब्बल २ लाख १८ हजार ९३० विक्रमी मताधिक्याने विजयी केले. अकाली एक्झिटनंतरदेखील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकरांच्या मनावरील ‘गारुड’ कायम असल्याचे निकालातून दिसून आले. रेकॉर्डब्रेक मताधिक्य देत अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुरुवातीला महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचे आकाश मोरे आणि ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरील घडामोडीनंतर मोरे आणि प्रा. हाके यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्याचवेळी निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पवार यांच्यासह २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, विरोधी उमेदवारांचा अपेक्षित प्रचार रंगलाच नाही, त्यांचा कोणताही प्रभावी जनसंपर्क दिसून आला नाही. शिवाय पवार यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना ‘रेकाॅर्डब्रेक’ मतदान मिळविण्यासाठी सुरुवातीपासूनच कंबर कसली होती. या ऐतिहासिक विजयावरही बारामतीत जल्लोषाचे रंग उमटले नाहीत. दुःखातून अद्याप सावरलेले नसल्याने बारामतीकरांनी  शांततेतच हा विजय स्वीकारला.

महायुतीचा पाठिंबा

सन १९९१मध्ये शरद पवार संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यावेळी अजित पवार यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्यासाठी जागा रिकामी केली होती. अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी या पोटनिवडणुकीची सूत्रे घेत रणनीती आखली.

शरद पवार गटाच्या वतीने आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराच्या सांगता सभेला उपस्थित राहत मतदानाचे आवाहन केले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगता सभेला उपस्थित राहत पूर्ण पाठिंब्याचे संकेत दिले होते.

१३.३ टक्के मतदान कमी

पोटनिवडणुकीत ५८.२७ टक्के मतदान झाले. २०२४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ४८ हजार ३२१ मतदारांनी म्हणजेच १३.३ टक्के मतदारांनी मतदान केले नाही.

हा विजय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे .शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण आणि अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार आहे.

सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री

१९६७पासून ‘पवार पर्व’अबाधित

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९६७मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या पहिल्याच निवडणुकीत प्रतिस्पर्धी बाबालाल काकडे यांचा पराभव करत बारामतीच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली. त्यानंतर १९७२, १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० अशा सलग निवडणुकांमध्ये शरद पवार यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली. १९९१ मध्ये शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर बारामतीच्या राजकारणाची सूत्रे अजित पवार यांच्या हाती आली. त्यांनी मतदारसंघावरील आपली  पकड वेळोवेळी सिद्ध केली.

६४ वर्षांनंतर महिला आमदार

सुनेत्रा पवार या बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार ठरल्या आहेत. याआधी १९६२मध्ये मालतीबाई शिरोळे (माई) यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत बारामतीचे प्रतिनिधित्व केले होते. तब्बल ६४ वर्षांनंतर पुन्हा एकदा महिला नेतृत्व बारामतीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे.

Web Title : रिकॉर्ड तोड़ मत: बारामती ने अजित पवार को श्रद्धांजलि दी, सुनेत्रा पवार जीतीं।

Web Summary : सुनेत्रा पवार ने रिकॉर्ड अंतर से बारामती जीता, अजित पवार को श्रद्धांजलि दी। विपक्ष की वापसी के बावजूद, पवार ने महायुति के समर्थन से शानदार जीत हासिल की। उन्होंने विरासत को बनाए रखने का वादा किया।

Web Title : Record-breaking votes: Baramati pays tribute to Ajit Pawar, Sunetra Pawar wins.

Web Summary : Sunetra Pawar won Baramati by a record margin, honoring Ajit Pawar. Despite opposition withdrawal, Pawar secured a landslide victory with Mahayuti support. She pledged to uphold their legacy.