ब्युटी पार्लरच्या नोकरीचे आमिष; पुण्यातील बुधवार पेठेतून ४ बांगलादेशी महिलांची सुटका, एका आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:16 IST2026-03-06T17:16:17+5:302026-03-06T17:16:45+5:30
महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे आणि पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येत होते

ब्युटी पार्लरच्या नोकरीचे आमिष; पुण्यातील बुधवार पेठेतून ४ बांगलादेशी महिलांची सुटका, एका आरोपीला अटक
पुणे: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी चार बांगलादेशी महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 71/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 143(1), 143(3), 3(5) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 मधील कलम 3, 4, 5, 6 आणि 7 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गंगाधर जावळगी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोन-1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर बुधवर पेठेतील जनता बिल्डिंग येथे छापा टाकण्यात आला. 5 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहा या वेळेत पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत जनता बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या घरावर धाड टाकली.
छाप्यादरम्यान चार बांगलादेशी महिलांना वेश्या व्यवसायासाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले. यात निशा उर्फ डॉली अख्तर (वय 34), फुलमती बेगम मोहम्मद अफजल हुसेन (वय 55), शिरीना शरीफ फुल मुल्ला (वय 35) आणि लता उर्फ शेलिना समशूर शेख (वय 46) या महिलांचा समावेश आहे. या सर्व महिला बांगलादेशातील वेगवेगळ्या भागातील असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिस तपासात आरोपींनी या महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून भारतात आणल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांना धमकावून आणि पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येत होते. या महिलांना वेश्यालयात ठेवून त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर आरोपी स्वतःचा उदरनिर्वाह करत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी भोपसिंग राजपूत या आरोपीला बुधवर पेठ परिसरातून ताब्यात घेतले आहे. तसेच बांगलादेश एजंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुल्ला’ नावाच्या व्यक्तीसह बाबू भैय्या उर्फ पापा शेख आणि घरमालक मीनाक्षी रमेश मेत्री यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.