पुण्यात सराफ व्यवसायिकांची बॅग भरदिवसा लंपास; ८०० ग्रॅम सोने, २ किलो चांदींवर चोरट्यांचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 22:29 IST2020-12-31T22:28:15+5:302020-12-31T22:29:36+5:30
ही घटना रविवार पेठेतील आर सी एम गुजराथी शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली.

पुण्यात सराफ व्यवसायिकांची बॅग भरदिवसा लंपास; ८०० ग्रॅम सोने, २ किलो चांदींवर चोरट्यांचा डल्ला
पुणे : गाडीतून ऑईल लिकेज झाल्याचे सांगून मदत करण्याच्या बहाण्याने दोघा चोरट्यांनी एका सराफ व्यवसायिकांच्या गाडीतील बॅग लंपास केली. बॅगमध्ये ८०० ग्रॅम सोने व २ किलो चांदी असा ऐवज होता.
याप्रकरणी सराफ व्यवसायिक करण माळी (रा. देहुरोड) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना रविवार पेठेतील आर सी एम गुजराथी शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळी यांचे देहुरोड येथे सोन्याचे दुकान आहे. व्यवसायाच्या निमित्ताने ते माल खरेदी करण्यासाठी रविवार पेठेते आले होते. ते परत जात असताना चोरट्यांनी माळी यांना त्यांच्या गाडीतून ऑईल लिकेज होत असल्याची बतावणी केली. माळी हे कारमधून खाली उतरुन त्यांनी बोनेट उघडून ऑईल कोठून गळत आहे, हे पाहू लागले. ही संधी साधून चोरट्यांनी सोने व चांदी ठेवलेली बॅग चोरुन ते पळून गेले. काही वेळातच चोरट्यांनी आपल्याला फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ फरासखाना पोलिसांकडे धाव घेतली. चोरीचा हा प्रकार समजताच फरासखाना पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
चोरट्यांच्या बतावणीला सराफ व्यवसायिक भुलले़ त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी सोने चांदी असलेली बॅग चोरुन नेली असून चोरट्यांचा शोधासाठी पथके रवाना झाली असल्याचे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले.