बाबासाहेबांचे तळेगावमधील निवासस्थान अनेक घडामोडींचे साक्षीदार; अनेक वर्षे वास्तव्याच्या स्मृती आजही जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:08 IST2025-12-06T13:07:08+5:302025-12-06T13:08:50+5:30
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी ५६ वेळा भेट दिली, संविधानाचे कामही या बंगल्यात झाले आहे.

बाबासाहेबांचे तळेगावमधील निवासस्थान अनेक घडामोडींचे साक्षीदार; अनेक वर्षे वास्तव्याच्या स्मृती आजही जिवंत
योगेश्वर माडगूळकर
पिंपरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानी अनेक राजकीय-सामाजिक निर्णय घेतले. या निवासस्थानी १९४९ ते १९५४ या काळात बाबासाहेबांची ये-जा होती. येथे अनेक वर्षे वास्तव्य करणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृती आजही जिवंत आहेत.
तळेगाव-चाकण रोडलगतच्या ‘अल्टीनो कॉलनी’त हे निवासस्थान आहे. बंगल्यातील बैठकीची प्रशस्त खोली, लाकडी कलाकुसरीची सजावट, सागवानी कपाटे, स्वयंपाकघर, स्नानगृह यांत त्या काळातील वास्तुरचनेची झलक दिसते. आत प्रत्येक खोलीत बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांच्या छायाचित्रांद्वारे इतिहास जतन केला आहे. हॉलमधील दीक्षाभूमीची लाकडी प्रतिकृती आणि सम्राट अशोकाचे चित्र ही बंगल्याची खास ओळख आहे. बुद्ध पर्वतातील कार्ले, भाजे, बेडसे लेण्यांच्या सान्निध्यात बुद्धधम्माच्या पुनरुज्जीवनाची प्रेरणा आणि शैक्षणिक क्रांतीचे बीज रोवण्यासाठी ही भूमी योग्य असल्याची बाबासाहेबांची धारणा होती, असे त्यांचे अनुयायी आठवणी जागवताना सांगतात. १४ एप्रिल १९५१ रोजी शेड्युल कास्ट फेडरेशनची बैठक या बंगल्यात झाली होती, असाही उल्लेखही आढळतो.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी ५६ वेळा भेट दिली. काशीबाई गायकवाड आणि दत्तात्रेय गायकवाड यांनी त्यांच्या जेवण्याची सोय केली होती. संविधानाचे कामही या बंगल्यात झाले आहे. दरवर्षी या ठिकाणी विविध उपक्रम घेतले जातात. येथे अभ्यासिका आहे. या परिसरात भव्यदिव्य स्मारक उभारण्यासाठी स्मारक समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. - एल.डी. गायकवाड, उपाध्यक्ष, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, तळेगाव दाभाडे
तळेगावची शुद्ध हवा व तेथील वातावरण बाबासाहेबांना आवडत असे. तळेगावला खास करून विश्रांतीसाठी आमचे जाणे-येणे होते, असा उल्लेख ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात’ या पुस्तकात माईसाहेबांनी केला आहे. या ठिकाणी अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांची निवड ‘आयएस’ आणि ‘आयपीएस’ पदावर व्हावी, ही अपेक्षा आहे. - किसन थूल, सचिव, स्मारक समिती, तळेगाव दाभाडे
तळेगावमधील बाबासाहेबांच्या बंगल्यावर गो. नी. दांडेकर, गाडगे महाराज येऊन गेले होते. रामानंद गडपायले यांनी याच बंगल्यात भीमगीत गायिले होते. बाबासाहेबांनी त्यांना प्रशस्तिपत्र दिले होते. काही काळ बाबासाहेब लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’मध्येही थांबले होते. - प्रभाकर ओव्हाळ, ज्येष्ठ साहित्यिक