Maharashtra HSC Result 2025: अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:22 IST2025-05-05T13:20:08+5:302025-05-05T13:22:05+5:30
अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या, बारावी म्हणजे सर्व काही नाही

Maharashtra HSC Result 2025: अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा
पुणे : बारावीचे वर्ष जीवनातील अतिशय महत्त्वाचे...जीवनाला कलाटणी देणारे...त्यामुळे सर्वस्व पणाला लावून अभ्यासाला लागा...असा विद्यार्थ्यांवर आधीच मारा झालेला. पालकही त्याला अपवाद नाहीत. विद्यार्थ्यांइतकेच पालकही पॅनिक झालेले. हे वर्ष मुलाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे, असे मानून पालकही कामाकडे थाेडे दुर्लक्ष करून मुलांवर फाेकस केलेले, त्यामुळे विद्यार्थ्यांइतकीच पालकांनाही निकालाची उत्सुकता लागलेली. त्याच वेळी धाकधूकदेखील वाढलेली. मानसाेपचार तज्ज्ञ म्हणून मी पालक आणि विद्यार्थी दाेघांनाही एकच सांगेन की, जाे काही निकाल लागेल ताे शांतपणे स्वीकारा. चांगले मार्क मिळाले म्हणून अतिउत्साहात काही करू नका. कमी मार्क पडले म्हणून खचून जाऊ नका, दाेन्ही प्रकारचा मानसिक धक्का स्वत:ला आणि कुटुंबाला धाेका निर्माण करणारा ठरू शकलाे, असा सल्ला ज्येष्ठ मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. अमर शिंदे यांनी दिला आहे.
बऱ्याचदा निकालापूर्वीची स्थिती खूप वेगळी असते. अनेक आखाडे बांधलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल लागताे तेव्हा विद्यार्थी आणि पालकांनाही धक्का बसत असताे. मग ताे सुखद असाे की धक्कादायक. दाेन्ही प्रकारचा ताण जीवघेणा ठरू शकताे. त्यामुळे आपण निकालाला कसे सामाेरे जाताे, यावर पुढील सर्व काही अवलंबून आहे. तेव्हा पालक आणि विद्यार्थी दाेघांनीही एक ठरवलं पाहिजे की, जाे काही निकाल लागेल त्याचा सर्वप्रथम शांतपणे स्वीकार करू. अन्यथा अनुचित प्रकार घडण्याचा धाेका अधिक असताे. संभाव्य धाेका टाळण्यासाठी आपण प्रथम वास्तव स्वीकारावे, त्यानंतर त्यावर विचार करून प्रतिक्रिया द्यावी. कमी मार्क पडले म्हणून, सर्व काही संपलं असं हाेत नाही आणि खूप जास्त मार्क पडले म्हणून सर्व जग खुलं झालं, असंही हाेत नाही. यामुळे एखाद्याला मार्क कमी पडले तरी ताे डिप्रेशनमध्ये जाणार नाही. मग ताे वास्तव नाकारणार नाही. शिवाय आई-वडील, नातेवाईक यांच्याशी वाटाघाटी (बार्गेनिंग) करणार नाही, विद्यार्थी आणि पालकांमध्ये हाेणारे संभाव्य आराेप-प्रत्याराेप टळतील, तणावातून मुक्तता मिळेल आणि विद्यार्थी टाेकाचे पाऊल उचलणार नाही.
आत्मविश्वास हरवू नका
समुपदेशक विवेक वेलणकर म्हणाले की, बारावीचा निकाल म्हणजे अंतिम नाही. परिस्थिती खूप बदललेली आहे. यात प्रत्येकाला संधी आहे. त्यामुळे आत्मविश्वास हरवू देऊ नका. विश्वासाने निकालाला सामाेरे जा आणि नवीन वाट शाेधा.
...तर काय कराल?
अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या, बारावी म्हणजे सर्व काही नाही, आयुष्यात आणखी खूप काही करण्यासारखे आहे, हे स्वत:ला सांगा आणि समजून घ्या, फारच डिप्रेशन आलं असेल तर मानसाेपचार तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्या. हे केवळ विद्यार्थीच नाही, तर पालकांनीही करायचं आहे, असेही डाॅ. अमर शिंदे यांनी सांगितले.