उरुळी कांचन: पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांची मालिका सुरूच असून थेऊर परिसरात पुन्हा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ५) रात्री घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६, रा. भीमनगर, थेऊर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे राहण्यासाठी आली होती. याच संधीचा गैरफायदा घेत शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन करत अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या आरडाओरडीतून शेजाऱ्यांना प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली.
यानंतर संतप्त नागरिकांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनीही कोणतीही दिरंगाई न करता आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
दरम्यान, नसरापूर येथील अत्याचार-हत्या प्रकरण आणि पर्वतीतील घटना ताज्या असतानाच पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “नराधमांना कायद्याचा धाक उरला नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Web Summary : In Theur, a shocking incident occurred where a 6-year-old girl was assaulted. Neighbors intervened upon hearing her screams, leading to the arrest of the accused by Loni Kalbhor police under the POCSO Act. The incident has sparked outrage, raising concerns about child safety.
Web Summary : थेऊर में एक चौंकाने वाली घटना में, 6 वर्षीय बच्ची के साथ छेड़छाड़ की गई। चीखें सुनकर पड़ोसियों ने हस्तक्षेप किया, जिससे लोनी कालभोर पुलिस द्वारा आरोपी को पोक्सो एक्ट के तहत गिरफ्तार किया गया। इस घटना से आक्रोश फैल गया है, जिससे बच्चों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।