पुणे: मागील काही वर्षापासून शासनाकडून विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षद, नक्षलवादी असे शिक्के मारून त्यांच्या कामांचा प्रभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही चांगले काम करणाऱ्या अनेकांना नक्षली ठरवून तुरुंगात टाकण्यात आले. मात्र न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने अनुकूल आला. त्यामुळे या विरोधात आपण सर्वांनी जनमत तयार करणे गरजेचे आहे,’ असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांनी त्यांच्या पुण्यातील मोदी बाग येथील निवास्थानी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे. हभप श्यामसुंदर सोन्नर यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचा प्रश्नावर पवार म्हणाले, ‘पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी झाल्यासंदर्भात दोन संस्थांची नावे पुढे आली आहेत. त्यातील एक लोकायत ही संस्था आहे. या संस्थेकडून अनेक चांगली कामे केली जात आहेत. ही संस्था नक्षली नाही, ती प्रागतीक विकास करण्याचे काम करते. हभप श्यामसुंदर सोन्नर हे अनेक वर्षांपासून समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. चांगले काम करणाऱ्या आणि विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षलींचे शिक्के मारण्याचे काम मागील काही वर्षापासून सुरू आहे.
राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘राज्यातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी चांगले रस्ते केले आहेत. या परिस्थितीत एक चांगला रस्ता असताना दुसरा रस्ता गरजेचे आहे का, याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही तर आम्ही या मार्गाला विरोध करणारे राजू शेट्टी व इतरांना समर्थन दिले जाईल.’
शिवसेना-मनसेच्या विजयी मेळाव्यात राष्ट्रवादीचा सहभाग
हिंदी सक्तीसंदर्भात शिवेसना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने मुंबईतील वरळी येथे आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात राष्ट्रवादी सहभागी होण्यासंदर्भातही पवार म्हणाले, ‘यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका जाहीर केली आहे. हिंदी सक्तीविरोधातील आंदोलना पक्षाने पाठिंबा दिला होता. सहभागासंदर्भात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्षांचा आदेश मी मानतो. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी या मेळाव्यात सहभागी होणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.