समोरून ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला वाचवण्याचा प्रयत्न; एसटीची रिक्षाला धडक, ४ जण जखमी, पुणे नाशिक महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:46 IST2026-01-02T14:45:08+5:302026-01-02T14:46:02+5:30
रिक्षातील चार प्रवासी जखमी झाले असून एसटी मधील ४० प्रवासी सुदैवाने सुखरूप आहेत

समोरून ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला वाचवण्याचा प्रयत्न; एसटीची रिक्षाला धडक, ४ जण जखमी, पुणे नाशिक महामार्गावरील घटना
मंचर: समोरून ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसची रिक्षाला धडक बसून रिक्षातील चार जण जखमी झाले आहेत. एसटी बस मधील 40 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. हा अपघातपुणे नाशिक महामार्गावर मंचर गावच्या हद्दीत मोरडे कॅडबरी कंपनीसमोर सकाळी पावणे सात वाजता झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव एसटी आगाराची नारायणगाव ते पुणे ही एसटी बस ही पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी समोरच्या बाजूने एक गाडी ओव्हरटेक करून वेगाने पुढे आली. या गाडीला वाचवण्यासाठी एसटी बस चालक पोपट गोरख झंझड याने एसटी बस उजव्या बाजूला घेतल्याने समोरून येणारी रिक्षा आणि एसटीची धडक बसली. अवसरी येथून रिक्षा मधून चार जण मंचर येथे निघाले होते. या अपघातात रिक्षातील दीक्षा येलभर, रंजना शिंदे, दीपक विरनक, विकास येलभर हे जखमी झाले आहे. एसटी बसमध्ये 40 प्रवासी होते ते सुदैवाने बचावले आहे. एसटीच्या डाव्या बाजूच्या भागाचे नुकसान झाले आहे. अपघातामध्ये रिक्षाचेही नुकसान झाले असून चारही जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विकास येलभर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मंचर आगार व्यवस्थापक वसंत अरगडे, वाहतूक नियंत्रण सलील सय्यद, सहाय्यक वाहतूक निरीक्षक जनार्दन शिंगाळे यांनी प्रवाशांना मदत केली. त्यांना एसटी वाहनांमध्ये बसून पुढे रवाना करण्यात आले. या संदर्भात एसटी चालक पोपट गोरख झंजाड यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात कारचालका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.