स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:07 IST2025-10-11T19:05:43+5:302025-10-11T19:07:01+5:30
काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळे लढण्याची वेळ आली तरी मनभेद होणार नाहीत, याची काळजी घेऊ

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे
पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढण्याची कसलीही तयारी भाजप करत नाही. या निवडणुका महायुतीमधील १३ ही पक्ष एकत्रितरीत्या महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळे लढण्याची वेळ आली तरी मनभेद होणार नाहीत, याची काळजी घेऊ. भविष्यात महायुती अभेद्य राहील याची काळजी घेऊ, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी बावनकुळे यांच्यासह इतर मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कायम ठेवणे, समन्वय साधने, शेतकरी पॅकेजचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेणे यांसह संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आम्ही स्वबळाची कसलीही तयारी करत नाही. एखाद्या ठिकाणी महायुती नाही झाली तर मनभेद होतील, अशी टीका मोठा भाऊ म्हणून भाजप नेते करणार नाहीत. समोरून टीका झाली तरी त्याला प्रखर शब्दांत उत्तर दिले जाणार नाही. महायुतीला धक्का बसेल असे वक्तव्य भाजप नेते व कार्यकर्ते करणार नाहीत. तशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आम्ही महायुतीत मिठाचा खडा टाकणार नाही, राज्यातील महायुती अभेद्यच राहील, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.
पुण्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर भाजप नेत्यांवर सातत्याने टीका करत असल्याच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी मी निवडणुकीतील टीकेबद्दल बोलतो, असे म्हणत अधिक बोलणे टाळले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५१ टक्के मते घेऊन महायुती विजयी होईल. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासाची कामे केली जातील, हा विश्वास राज्यातील जनतेला आहे. महायुती ५१ टक्क्यांवर आहे, हे विरोधकांचे सर्व्हे सांगत आहेत. त्यामुळे हारलेल्या मानसिकतेतून स्टंटबाजी करत निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत. निवडणूक आयोगाने मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. विरोधकांनी त्यावर काम करणे गरजेचे आहे, जी यादी अडचणीची आहे, त्यावर आक्षेप घेणे गरजेचे आहे. मात्र, ते निवडणूक आयोगाला भेटायला जात आहेत, ही स्टंटबाजी व खोटारडेपणा आहे, असेही बावनकुळे म्हणाले.