मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर

By नितीश गोवंडे | Updated: February 23, 2024 15:38 IST2024-02-23T15:37:54+5:302024-02-23T15:38:13+5:30

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्यासोबत आरोपीने जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले

Assaulting a minor girl by beating When a girl gets pregnant she faces a shocking situation | मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यावर धक्कादायक प्रकार समोर

पुणे : अल्पवयीन मुलीला मारहाण करुन वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत खराडी, वाघोली येथे घडला आहे.

याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने गुरुवारी (दि. २२) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून मयुर संजय केंद्रे (२४, रा. खांदवेनगर, लोहगाव) याच्यावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला वाघोली आणि खराडी येथे बोलवून घेतले. पीडित मुलगी त्याठिकाणी आली असता तिला एका महिलेच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिला शिवागाळ करुन मारहाण केली. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. दरम्यान, पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर राहिली. आरोपीने हा प्रकार लपवण्यासाठी मुलीवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक खांडेकर करत आहेत.

Web Title: Assaulting a minor girl by beating When a girl gets pregnant she faces a shocking situation