निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक; बेकायदा पिस्तूलप्रकरणी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासह ५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:20 IST2025-11-22T13:20:17+5:302025-11-22T13:20:25+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय व्यक्तीने एका व्यक्तीसोबत झालेल्या वादातून स्वसंरक्षणासाठी पिस्तूल विकत घेतल्याचे समोर आले आहे

निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक; बेकायदा पिस्तूलप्रकरणी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासह ५ जणांना अटक
बाणेर : बाणेर परिसरात बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई करत पाच जणांना अटक केली असून, त्यामध्ये एका राजकीय व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईत आरोपींकडून ४५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीच्या चार जिवंत काडतुसांसह ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विनायक नागनाथ गायकवाड (२१, पिसोळी), विजय ऊर्फ चाँद काळे (३०, भालेकरनगर), जॉन ऊर्फ रिक्या जाधव (४०, जुनी सांगवी), विशाल कृष्णा गांधिले (४७, पॅनकार्ड रोड, बाणेर) आणि निसर्ग अर्जुन गांधिले (३७, ऋतुजा पार्क, बाणेर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अभय सुरेश ससाणे हा बेपत्ता आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल गांधिलेंचा एका व्यक्तीसोबत झालेल्या वादातून स्वसंरक्षणासाठी पिस्तूल विकत घेतल्याचे समोर आले आहे. गांधिले हे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून, आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक होते. पिस्तूल श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील अभय ससाणे याच्याकडून गायकवाडने खरेदी केले. त्यानंतर काळे आणि जाधव यांच्या माध्यमातून ते गांधिले याच्याकडे ४५ हजार रुपयांना विकण्यात आले. या व्यवहाराची माहिती पोलिस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना मिळाल्यानंतर पथकाने गायकवाडपासून साखळी उलगडत सर्वांना एकामागून एक ताब्यात घेतले. निसर्ग गांधिले याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख, उपनिरीक्षक गौरव देव, कर्मचारी दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, आदिनाथ येडे आणि गणेश खरात यांच्या पथकाने केली.