आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:36 IST2025-06-18T14:35:32+5:302025-06-18T14:36:06+5:30
एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ (भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती) अशा 'एआय'च्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे.

आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार
पुणे : सध्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’(एआय)चा सर्वत्र बोलबाला आहे. आता वारीतही ‘एआय’ दिंडी पाहायला मिळणार असून, यात ऑल इन्क्लुसिव्ह दिंडी, (विविध भाषा, प्रांत, वय आणि नोकरी / व्यवसायांतील लोकांना सामावून घेणारी सर्वसमावेशक दिंडी), आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर, आध्यात्मिक इंटेलिजन्स (नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा एक प्रयत्न) आणि एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ (भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती) अशा 'एआय'च्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे. परंपरेची ओळख सांगणारी आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही दिंडी यंदाच्या वारीचे आकर्षण ठरणार आहे.
भाविकांना जून महिना जवळ यायला लागला की वेध लागतात ते आषाढी पायी वारीचे! जवळपास १८ वर्षांपूर्वी याच वारकरी परंपरेत नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक दिंडीची एक अभिनव संकल्पना अस्तित्वात आली आणि 'आयटी दिंडी' या नावाने ती लोकप्रियदेखील झाली. मात्र, या नावाने पालखी सोहळ्यात सहभागी होत असताना आयटी दिंडीच्या टीमला काही मर्यादा लक्षात आल्या. अनेकांना वाटते की, फक्त आयटी क्षेत्रातीलच लोक या दिंडीत सहभागी होऊ शकतात का? घरातील अन्य व्यक्ती चालतील का? मी गृहिणी आहे.
अथवा निवृत्त आहे, मला सहभागी होता येईल का... इ. यासाठी अधिकाधिक लोकांना या वारीमध्ये सहभागी करून घेणे, त्यांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि वारीसारख्या अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे या उद्देशाने वारीच्या पुणे ते पंढरपूर या टप्प्यांसाठी 'एआय दिंडी' या नावाने सेवा द्यायचे आमच्या टीमने ठरवले आहे. परंतु, पूर्वीप्रमाणेच आळंदी ते पुणे या टप्प्यात ‘आयटी दिंडी’ या नावाने व्यवस्था कार्यरत राहील, असे टीमकडून सांगण्यात आले आहे.
एआय दिंडी काय करते ?
* लोकांना सोयीच्या कोणत्याही दिवशी कोणत्याही टप्प्यात सहभागी होता येईल, अशी खास व्यवस्था आयोजकांनी विकसित केली आहे.
* ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली आहे. उदाहरणार्थ, शनिवारी तुम्हाला वेळ आहे आणि पालखी जेजुरी ते वाल्हे या टप्प्यात आहे, तर आम्ही स्वारगेटहून जेजुरीसाठी बस ठेवतो. त्या टप्प्याची वारी केली की संध्याकाळी परत पुण्यात आणतो.
* वारीत चालताना आपल्याला अभंग म्हणता यावेत, टाळ वाजवता यावा, पावले खेळता यावीत यासाठी एआय दिंडी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे ‘भजनसंध्या आणि वारीतील खेळ’ आयोजित करते.
* प्रत्येक टप्प्यासाठी नाममात्र सेवाशुल्क आकारले जाते. त्यामध्ये बससेवा (पुण्यापासून पुण्यापर्यंत), पाण्याच्या बाटल्या, नाष्टा, जेवण व एआय - दिंडी i नावाची टोपी दिली जाते.
• सलग काही दिवस वारी करायची असल्यास राहण्याचीही व्यवस्था केली जाते.
• संपूर्ण वारी (आळंदी ते पंढरपूर) करायची असल्यास तिचीही आखणी आणि मदत केली जाते.
इथे साधा संपर्क
नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या :
वारी २० जून ते ५ जुलै - २०२५ पर्यंत आहे.
www.aidindi.org
संपर्क : 8055566773 / 8055566775 / 8055566774