सरत्या वर्षांत पुण्यातून तब्बल १ कोटी ८ लाख नागरिकांचा विमान प्रवास; संख्येत ६ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:50 IST2026-01-01T11:49:52+5:302026-01-01T11:50:06+5:30
सन २०२४ मध्ये ६७ हजार ४८४ उड्डाणे झाली होती. तर २०२५ मध्ये यात वाढ होऊन ७० हजार ९९२ उड्डाणांची नोंद झाली आहे.

सरत्या वर्षांत पुण्यातून तब्बल १ कोटी ८ लाख नागरिकांचा विमान प्रवास; संख्येत ६ टक्क्यांनी वाढ
पुणे: लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२५ या वर्षांत प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाले आहे. गेल्या वर्षभरात पुणेविमानतळावरून उड्डाणांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ होण्यास मदत झाली आहे. २०२५ मध्ये पुण्यातून १ कोटी ८ लाख ६० हजार प्रवाशांनी पुणे विमानतळावरून प्रवास केला असून, प्रवासी संख्येत ६.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनल झाल्यामुळे प्रवाशांना सोयी-सुविधा मिळत आहेत. दुसरीकडे विमान उड्डाणांची संख्या देखील वाढविण्यात आले आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होत आहे. प्रवासी-केंद्रित सुविधा, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सेवा गुणवत्तेवर दिलेल्या भरामुळे विमानतळाच्या विकासाला नवी दिशा मिळाली. सध्या विमानतळावरून दररोज २०० च्या पुढे विमांनाच्या फेऱ्या होत आहेत. नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर काही नवीन शहरे जोडण्यात आली आहेत तसेच, यंदा दोहा ही नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
उड्डाणांची संख्या वाढली...
नवीन टर्मिनल झाल्यावर पुण्यातून विमान उड्डाणांची संख्या वाढविण्यात आले आहे. सन २०२४ मध्ये ६७ हजार ४८४ उड्डाणे झाली होती. तर २०२५ मध्ये यात वाढ होऊन ७० हजार ९९२ उड्डाणांची नोंद झाली आहे. उड्डाणांच्या संख्येत देखील ५.१ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. उड्डाणे वाढल्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. या वाढत्या प्रवाशांचे व्यवस्थापन करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने तांत्रिक आणि डिजिटल सुविधा मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत.
जागतिक क्रमवारीत सुधारणा...
डिजी यात्रासह ई-गेट्स, इनलाइन बॅगेज स्क्रीनिंग सिस्टीम, प्रवाह व्यवस्थापन प्रणाली आणि १०६ उड्डाण माहिती स्क्रीनमुळे प्रतीक्षा वेळ कमी झाली असून, प्रवाशांना वेळेवर माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे प्रवासी समाधानी असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. सन २०२५ मध्ये सर्व्हेत पुणे विमानतळाला ४.९२ ते ४.९६ असे गुण मिळत राहिले आणि जागतिक क्रमवारीत सुधारणा झाली, अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
अशी आहे आकडेवारी
महिना -- वर्ष (२०२५) -- वर्ष (२०२४)
जानेवारी - ९४६८०३ -- ८०४१६७
फेब्रुवारी - ८४०४७०-- ७८९४९५
मार्च - ८५५२९८-- ८२७७२७
एप्रिल - ९२४०४७-- ८३४४३३
मे - ९३८५५२-- ८९४५९३
जून - ९१०२५८---८३४९३९
जुलै -- ८६६३६३--८४९६५३
ऑगस्ट - ९०१२१७-- ८५१२३९
सप्टेंबर - ८५०२१४--८३६१७३
ऑक्टोबर - ९१७१८३--८५९२२९
नोव्हेंबर - ९८९२३५--९००५९३
डिसेंबर -- ९२४९९९--९५४२७१
एकूण -- १०८६४६३९---१०२३६५१२