जोपर्यंत माझे हातपाय हलतात, तोपर्यंत तुमचं भलं करीन…! ठाम शब्दात सांगणारे अजितदादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:06 IST2026-01-29T16:00:25+5:302026-01-29T16:06:14+5:30
राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी प्रशासन, विकासकामे, पाणीप्रश्न, सिंचन, अर्थसंकल्प आणि शेतकरी हिताचे निर्णय यासाठी कायमच ठोस भूमिका घेतली

जोपर्यंत माझे हातपाय हलतात, तोपर्यंत तुमचं भलं करीन…! ठाम शब्दात सांगणारे अजितदादा
पुणे : जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना, तोपर्यंत तुमचं भलं करीन. मी काम करून दाखवलं आहे. मी कामाचा माणूस आहे. असे ठाम शब्दांत सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका जुन्या भाषणाची क्लिप बुधवारी (दि.२८) समाजमाध्यमांवर फिरत होती. विमान अपघातात झालेल्या त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अजित पवार यांच्या कार्यशैलीशी संबंधित अनेक आठवणी, प्रसंग आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी माळरानावर विखुरलेल्या फायलीतील कागद पाहूनही त्यांच्या अविरत, कार्यमग्न वृत्तीचे दर्शन घडले. महत्त्वाच्या फाइल्स, कागदपत्रे आणि नोंदी हे अजित पवार यांच्या सतत कामात व्यस्त असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. काम, शिस्त आणि निर्णयक्षमता, हीच त्यांची खरी ओळख असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी प्रशासन, विकासकामे, पाणीप्रश्न, सिंचन, अर्थसंकल्प आणि शेतकरी हिताचे निर्णय यासाठी कायमच ठोस भूमिका घेतली. ‘मी कामाचाच माणूस आहे’ हे वाक्य त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचे सार असल्याचे अनेकांनी नमूद केले.
सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय नेते यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा म्हणजे कामाचा वेग, निर्णयातील ठामपणा आणि जबाबदारीची जाणीव, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट, फोटो, व्हिडीओ आणि लेखांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम केला जात आहे. अजित पवार यांचे आकस्मिक निधन राज्यासाठी मोठी हानी असून, त्यांच्या कार्यमय जीवनाची आठवण करून देणारे हे व्हायरल क्षण आज जनतेच्या मनात कायमचे कोरले जात असल्याचे चित्र आहे.