अरुण गवळीचा पीए बोलतोय; नावाने ५ कोटींची खंडणी, पुण्यात तोतया गँगचा भंडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:44 IST2025-08-12T16:43:19+5:302025-08-12T16:44:31+5:30
कॉल करणाऱ्याने स्वतःला "प्रशांत पाटील, अरुण गवळी यांचा पीए" सांगत, चौरे यांच्याशी संबंधित वाद मिटवण्यासाठी धमकी दिली

अरुण गवळीचा पीए बोलतोय; नावाने ५ कोटींची खंडणी, पुण्यात तोतया गँगचा भंडाफोड
पुणे: पुण्यात पोलिसांनी एका मोठ्या तोतया गँगचा पर्दाफाश करत ५ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडलं आहे. या गँगने स्वतःला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा पीए असल्याचं सांगत व्यावसायिकाला धमकावत खंडणी मागितली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४९ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी यांचे कॅम्प परिसरात ऑफिस असून २०२२ मध्ये आरोपी सुमित चौरे यांच्याशी बांधकाम प्रकल्पासाठी व्यवहार झाला होता. पुढे २०२३ मध्ये बांधकाम अनधिकृत ठरल्याने महापालिकेने ते पाडून टाकलं आणि या प्रकरणी दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. २८ जुलै रोजी फिर्यादींना अज्ञात क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला "प्रशांत पाटील, अरुण गवळी यांचा पीए" सांगत, चौरे यांच्याशी संबंधित वाद मिटवण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी आरोपी सुदर्शन गायके आणि त्याचा मित्र फिर्यादींच्या ऑफिसमध्ये येऊन "डॅडी" चे सचिव तुमच्याकडे आणतो" अशी धमकी देऊन निघून गेले.
९ ऑगस्ट रोजी गायकेने पुन्हा फोन करून "तू ५ कोटींमध्ये मॅटर सेटल कर" असा तगादा लावला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. ११ ऑगस्ट रोजी विमाननगरमधील एका हॉटेलमध्ये फिर्यादी आणि गायके यांची भेट ठरवण्यात आली. येथे आधीच गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिसांनी सापळा रचला होता. गायकेसोबत आलेल्या तिघांनी "पाच कोटी दे नाही तर मारून टाकू" अशी धमकी दिली आणि त्याचवेळी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं.
आरोपींची नावे सुमित चौरे, रोहन गवारे, सुदर्शन गायके, महेंद्र शेळके आणि कृष्ण बुधनर अशी असून त्यापैकी तिघांना अटक झाली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३), ३०८(४), ३५१(३), ३५१(४), ३५२ आणि ६१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे."