अफगाणिस्तान- हाँगकाँगमधील व्यक्तींशी भारतविरोधी संभाषणे; जुबेर हंगरगेकरच्या धक्कादायक बाबी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 21:06 IST2025-12-25T21:05:43+5:302025-12-25T21:06:53+5:30
जुबेरकडून मिळालेले डिजिटल व गुप्तचर पुरावे त्याला थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूल्स तसेच महाराष्ट्रातील पडघा गावाशी जोडतात असा दावा एटीएसने केला आहे

अफगाणिस्तान- हाँगकाँगमधील व्यक्तींशी भारतविरोधी संभाषणे; जुबेर हंगरगेकरच्या धक्कादायक बाबी समोर
पुणे : कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवादी जुबेर हंगरगेकर याचे अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी थेट संबंध असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जुबेरच्या मोबाईलमधून भारतविरोधी अनेक आक्षेपार्ह संभाषणे सापडली असून, ती अफगाणिस्तान व हाँगकाँगमध्ये बसलेल्या व्यक्तींशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जुबेरच्या टेलीग्राम ग्रुपमधील १०२ आयडीपैकी चार आयपी ॲड्रेस मिळाले आहे. त्यातील तीन आयपी ॲड्रेस हे अफगाणिस्तानचे तर एक आयपी ॲड्रेस हॉगकॉगचे आहेत.
राष्ट्रवादी कृत्यात सामील झाल्याच्या संशयावरून अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत गेलेल्या जुबेर हंगरगेकर याला पुन्हा एटीएसएसने ताब्यात घेत अटक केली आहे. जुबेरला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश पी.वाय लाडेकर यांनी त्याला 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जुबेर पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत होता. मात्र, प्रत्यक्षात तो कट्टरपंथी विचारधारेचा सक्रिय प्रचारक असल्याचा आरोप आहे. पडघा गावात त्याला खास बोलावणे येत असे आणि तेथे तो तरुणांचे मानसिक रूपाने कट्टरपंथीकरण करत ‘खिलाफत’ व हिंसाचाराची विचारधारा पसरवत होता. डिसेंबर 2023 मध्ये एटीएसने पडघा येथे पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकला होता. मात्र, कारवाईची चाहूल लागताच जुबेर तेथून फरार झाला होता. दोन वर्षांनंतर त्याची अटक झाल्यानंतर या संपूर्ण दहशतवादी नेटवर्कचे धागेदोरे उलगडू लागले आहेत. जुबेरकडून मिळालेले डिजिटल व गुप्तचर पुरावे त्याला थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूल्स तसेच महाराष्ट्रातील पडघा गावाशी जोडतात असा दावा एटीएसने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जुबेर ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात वारंवार जात असे. तेथे तो तरुणांना भारतविरोधी विचारसरणीकडे वळवून ‘जिहाद’साठी प्रवृत्त करत होता. भारताला ‘काफिर राष्ट्र’ ठरवून जिहाद हा धार्मिक कर्तव्य असल्याचा प्रचार तो करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पडघा परिसराला काही स्थानिक कट्टर घटकांकडून ‘ग्रेटर सीरिया’ अशी ओळख दिली जात असल्याचेही तपास यंत्रणांनी नमूद केले आहे. या भागातून यापूर्वी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले काही लोक देशातील विविध ठिकाणी झालेल्या स्फोटांच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती एटीएसकडे आहे. जुबेरच्या संपर्कातील साथीदार आणि संशयित व्यक्ती यांच्याकडे मिळून आलेल्या माहितीवरुन तपास करण्यासाठी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.