Anti Corruption Action: बारामतीत ३० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 18:09 IST2021-10-03T18:05:53+5:302021-10-03T18:09:09+5:30
पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Anti Corruption Action: बारामतीत ३० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिसाला रंगेहाथ पकडले
बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने रविवारी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिपान अभिमान माळी (वय ५६) असे कारवाई केलेल्या लाचखोर पोलीस अधिका-याचे नाव आहे. ते बारामती शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. या प्रकरणी एका ४२ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या गुन्ह्याचे चार्जशीट त्यांच्या बाजूने पाठवण्यासाठी माळी यांनी तक्रारदाराकडे ४० हजाराची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार रविवारी ३० हजाराची लाच स्वीकारतांना माळी यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक, पोलीस निरीक्षक भारत साळुंके, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, भूषण ठाकुर,चंद्रकांत कदम आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.