अण्णा बनसोडेंचे आक्या बाँड गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन! अजित पवारांनी खडेबोल सुनावले तरीही फरक पडला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 13:55 IST2025-05-06T13:54:30+5:302025-05-06T13:55:42+5:30
'आपण आता मोठ्या पदावर आहोत त्यामुळे व्यवस्थित वागले पाहिजे', अशा शब्दांत अजित पवारांनी बनसोडे यांचे कान टोचले होते

अण्णा बनसोडेंचे आक्या बाँड गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन! अजित पवारांनी खडेबोल सुनावले तरीही फरक पडला नाही
पिंपरी : विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि गुन्हेगार आकाश मोहोळ ऊर्फ आक्या बाँड एकमेकांना केक भरवत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आक्या बाँड याच्यावर १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित नुकत्याच झालेल्या सेलिब्रेशनमध्ये आक्या बाँडही सहभागी झाला होता.
वाढदिवसानिमित्त गुन्हेगार आक्या बाँडने अण्णा बनसोडे यांच्यासाठी केक आणि पुष्पगुच्छ आणला होता. बनसोडे आणि आक्या यांनी एकमेकांना केक भरवत वाढदिवस साजरा केला. शेजारीच आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे हाही होता. याबाबतची माहिती सिद्धार्थला होती, अशी चर्चा आहे. मात्र, हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सिद्धार्थच्या अकाउंटवरून हटविण्यात आला.
चिरंजीवावरून अजितदादांनी सुनावले होते!
बनसोडे यांचा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावरून पवार यांनी बनसोडे यांना सल्ला देत, आता विधानसभा उपाध्यक्ष असल्याने तुमच्या वागण्याकडे, बोलण्याकडे सर्वांचे बारीक लक्ष असेल. चिरंजीवांना देखील काही गोष्टी व्यवस्थित सांगितल्या पाहिजेत. आपण आता मोठ्या पदावर आहोत. त्यामुळे व्यवस्थित वागले पाहिजे, अशा शब्दांत कान टोचले होते. यानंतर आता वाढदिवसानिमित्त गुन्हेगाराने बनसोडे यांना केक भरवल्याने चर्चा रंगली आहे.
सामान्यांनी काय आदर्श घ्यायचा?
काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने मध्यरात्री भररस्त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मित्रांसोबत बर्थडे केक कापत रील बनवले होते. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली होती. आता प्रत्यक्ष विधानसभा उपाध्यक्षांचे गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन पुढे आल्यानंतर सामान्यांनी काय आदर्श घ्यावा, असा सवाल उपस्थित होत आहे.
माझा वाढदिवस असल्याने अनेकजण मला भेटायला आले. त्यांनी केक, पुष्पगुच्छ आणला, शुभेच्छा दिल्या. ते कोण होते, याबाबत मला कुठलीही कल्पना नव्हती. मी प्रत्येकाला तुम्ही कोण आहात, हे विचारू शकत नाही. मी जनतेतील आमदार आहे. - अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष