सकाळी कामाला जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; अपघातात तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 16:31 IST2025-09-26T16:30:44+5:302025-09-26T16:31:36+5:30
तरुणाच्या मागे आई-वडील आणि भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकस्मात निधनाने पारगाव आणि सविंदणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळी कामाला जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; अपघातात तरुणाचा मृत्यू
अवसरी : आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी फाटा येथे अष्टविनायक रस्त्यावर शुक्रवारी (दि. २६) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दत्तात्रय ज्ञानेश्वर गावडे (वय ३२, राहणार सविंदणे, ता. शिरूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
दत्तात्रय गावडे हे पारगाव येथील खताच्या दुकानात कामाला होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १४ सीएन ९८३०) कामावर जात असताना पोंदेवाडी फाटा येथे समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दत्तात्रय गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे पारगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी मंचर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सध्या पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. दत्तात्रय यांच्या मागे आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने पारगाव आणि सविंदणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.