पुणे : स्वारगेट बलात्काराच्या घटनेने पुणे शहरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुली, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकीय वर्तुळातूनही पुण्याच्या सुरक्षेवर ताशेरे ओढले जात आहेत. तसेच सत्ताधारी पक्षावर जोरदार टिका केली जात आहे. शिवसेना उबाठा गटाने स्वारगेटचे एसटी आगार फोडले आहे. यावेळी येथील बंद पडलेल्या बसेसची लॉजिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरोधकांकडून या घटनेबाबत अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट करत सरकारला शक्ती कायद्याची आठवण करून दिली आहे.
रोहित पवार म्हणाले, पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्याबरोबरच राज्यभरात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जाव्यात. इतकेच नाही तर महिला सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असणारा शक्ती कायदा राज्यात लागू करण्याबाबत तत्काळ निर्णय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अशी घडली घटना
तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करत होती. स्वारगेट एसटी स्टँड येथे थांबल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. मात्र, तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यादरम्यान आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गेला. बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला.