लम्पीवरील लसीच्या उत्पादनाची परवानगी द्या; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:08 IST2025-08-12T11:08:10+5:302025-08-12T11:08:56+5:30

राज्यातील सध्याची रोगाची स्थिती पाहता ३० दिवसांच्या चाचण्यांच्या आधारेच उत्पादनाची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून जनावरांना तातडीने ही लस देता येऊन मृत्यू हानी टाळता येईल

Allow production of Lumpy vaccine Proposal from Animal Husbandry and Dairying Department | लम्पीवरील लसीच्या उत्पादनाची परवानगी द्या; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून प्रस्ताव

लम्पीवरील लसीच्या उत्पादनाची परवानगी द्या; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून प्रस्ताव

नितीन चौधरी 

पुणे : गोवंशीय जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी रोगाच्या लसीच्या चाचणीचे निकाल येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक निष्कर्षांवरून ही लस सुरक्षित आणि सुरक्षा पुरविणारी आहे. त्यामुळे राज्यातील रोगाचा प्रादुर्भाव पाहता निकालांच्या आधारे लस उत्पादनाची परवानगी देण्याचा प्रस्ताव पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून केंद्रीय औषध महानियंत्रकांना देण्यात येणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर सुमारे ६ महिन्यांच्या कालावधीत ही लस सबंध राज्यातील गोवंश जनावरांसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती विभागाचे सहआयुक्त डॉ. याह्या खान पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पठाण म्हणाले, “गेल्यावर्षीच्या प्रादुर्भावानंतर विभागानेच ही लस तयार करण्याचे ठरविले. त्यानुसार पुण्यातील प्रयोगशाळेत ती तयारही केली. त्यानंतर राज्यातील ताथवडे (पुणे), जत (सांगली), जुनोने (सोलापूर), कोपरगाव (अहिल्यानगर) आणि पोहरा (अमरावती). या पाच ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या. हा रोग मुख्यत्वे गोवंशीय जनावरांमध्येच आढळत असला तरी ताथवडे येथे १०० म्हशींवरही या लसीची चाचणी घेतली आहे.”

पुण्यातच लसीचे उत्पादन

राज्यातील सध्याची रोगाची स्थिती पाहता ३० दिवसांच्या चाचण्यांच्या आधारेच उत्पादनाची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून जनावरांना तातडीने ही लस देता येऊन मृत्यू हानी टाळता येईल, असा प्रस्ताव विभागामार्फत देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महानियंत्रकांकडून ही परवानगी मिळाल्यानंतर लसीचे ६ लाख डोस महिनाभराच्या काळात उत्पादित केले जातील. पुढील सहा महिन्यांच्या आत ही लस उत्पादित केली जाऊ शकते, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

गेल्यावर्षी जनावरांना देण्यात आलेली लस शेळ्यांसाठी देवीची लस (गोट पॉक्स) होती. त्यातून जनावरांना ८ महिन्यांसाठी ८० टक्के संरक्षण मिळते. लसीकरणानंतरही काही जनावरांमध्ये यंदाही रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र, या जनावरांमध्ये रोगाची तीव्रता तुलनेने कमी आहे. लसीचा हा परिणाम आहे. आता लम्पीवर स्वतंत्र लस तयार केली आहे. - डॉ. याह्या खान पठाण, सहआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग, पुणे.

Web Title: Allow production of Lumpy vaccine Proposal from Animal Husbandry and Dairying Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.