डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात; महापौरांच्या प्रशासनास सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:49 IST2026-03-28T09:48:56+5:302026-03-28T09:49:06+5:30
मिरवणूक मार्गाचे वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था, अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य पथक व कार्डियाक ॲम्ब्युलन्स, विद्युत रोषणाई, अग्निशामक व्यवस्था, मोबाइल टॉयलेट, मंडप, स्टेज, मदत कक्ष उभारणी यासंदर्भात चर्चा झाली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात; महापौरांच्या प्रशासनास सूचना
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिण्याचे पाणी, विद्युत रोषणाई, स्वच्छता या स्वरूपाच्या आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. देखभाल दुरुस्ती, रंगरंगोटीच्या कामांनाही प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नियोजनासाठी महापालिकेत बैठक झाली. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव, महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख आशा राऊत, माधव जगताप, रवी पवार, वसुंधरा बारवे, अविनाश सपकाळ, नंदकिशोर जगताप, अशोक घोरपडे यांच्यासह महापालिका व पोलिसांच्या वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मिरवणूक मार्गाचे वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था, अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक व कार्डियाक ॲम्ब्युलन्सची, विद्युत रोषणाई, अग्निशामक व्यवस्था, महापालिका सुरक्षा, मोबाइल टॉयलेट, मंडप, स्टेज, मदत कक्ष उभारणी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. याबरोबरच सम्राट अशोकस्तंभाची देखभाल व दुरुस्ती, तसेच दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी, औंध येथील डी. पी. रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या नियोजनानुसार ३० मार्च रोजी विश्रांतवाडी येथे, तर ३१ मार्च पुणे स्टेशन परिसरातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात पुढील बैठका घेण्यात येणार असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.