Pune Rain: पुणेकरांनो शहरासाठी नव्हे घाट विभागासाठी अलर्ट ! हवामानतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
By श्रीकिशन काळे | Updated: July 9, 2024 13:20 IST2024-07-09T13:20:24+5:302024-07-09T13:20:34+5:30
दुपारी १२ नंतर तर चक्क उन्हाचा चटका जाणवत असल्याने मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट हा फुसका बार ठरल्याची भावना पुणेकरांमध्ये आहे

Pune Rain: पुणेकरांनो शहरासाठी नव्हे घाट विभागासाठी अलर्ट ! हवामानतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून घाट विभागामध्ये प्रचंड पाऊस होत आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पावसाचा जोर अधिक आहे. परंतु, सोमवारी हवामान विभागाने पुण्यातील घाट विभागामध्ये रेड अलर्ट दिलेला होता. तो पुणे शहरासाठी नव्हता, असे स्पष्टीकरण हवामानतज्ज्ञांनी दिले आहे.
रायगड, मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. आता मात्र मॉन्सून सक्रिय झाला असल्याने कोकण विभागात आणि घाट माथ्यावर अधिक पाऊस होत आहे. परिणामी अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. सोमवारी पुणे घाट विभागात रेड अलर्ट जारी केला, पण पुणे शहरासाठी तो लागू आहे, असे समजून प्रशासनाने मंगळवारी सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. शहरात सोमवारी सायंकाळनंतर सुरू झालेली पावसाची संततधार रात्री साडेअकरापर्यंत होती. त्यामुळे शहरामध्ये १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्यम ते हलक्या सरी कोसळल्याने कुठेही पाणी तुंबल्याची घटना समोर आली नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळपासूनच आकाश निरभ्र होते. काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळाले.
दुपारी १२ नंतर तर चक्क उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यामुळे मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट हा फुसका बार ठरल्याची भावना पुणेकरांमध्ये आहे. त्यावर हवामानतज्ज्ञांनी जाहीर केले की, रेड अलर्ट हा केवळ घाट विभागासाठी होता. पुणे शहरासाठी तो अलर्ट नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन केले आहे.
पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. पुणे शहरासाठी तो नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. - डॉ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
पुणे शहरातील सोमवारचा पाऊस
हडपसर : ४१ मिमी
लवासा : ३९.५ मिमी
हवेली : ३५.५ मिमी
बालेवाडी : ३५.५ मिमी
एनडीए : ३१.५ मिमी
बारामती : २०.६ मिमी
लोणावळा : २८.५ मिमी
मगरपट्टा : १६ मिमी
पाषाण : १४.५ मिमी
शिरूर : ११.५ मिमी
राजगुरूनगर : ७ मिमी
चिंचवड : ४ मिमी
नारायणगाव : २.५ मिमी
कोरेगाव पार्क : ०.५ मिमी