मद्यसेवन, पत्नीला मारहाण, मानसिक त्रास अखेर घटस्फोट; पत्नीला १० लाख पोटगी, सोने, लग्नखर्च मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:34 IST2025-01-21T13:33:43+5:302025-01-21T13:34:03+5:30
10 लाख रुपये देणे, मुलीचा ताबा पत्नीकडे देणे, लग्नात केलेला संपूर्ण खर्च पत्नीला देणे तसेच पुढील तीन महिन्यांत संपूर्ण सोने, स्त्रीधन, भेटवस्तू पत्नीला देण्याबरोबरच पत्नी आणि तिच्या कुटुंबियांशी संपर्क न करणे असे आदेश

मद्यसेवन, पत्नीला मारहाण, मानसिक त्रास अखेर घटस्फोट; पत्नीला १० लाख पोटगी, सोने, लग्नखर्च मंजूर
पुणे: मद्याचे भरपूर सेवन, पत्नीला मारहाण, शिवीगाळ असा सततचा शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाने मंजूर करीत पतीला चांगला दणका दिला. एक वर्षाच्या लढ्यानंतर पत्नीला दिलासा मिळाला आहे. पत्नीला कायमस्वरुपी पोटगीसह सहा महिन्याच्या आता 10 लाख रुपये देणे , मुलीचा ताबा पत्नीकडे देणे, लग्नात केलेला संपूर्ण खर्च पत्नीला देणे तसेच पुढील तीन महिन्यांत संपूर्ण सोने, स्त्रीधन, भेटवस्तू पत्नीला देण्याबरोबरच पत्नी आणि तिच्या कुटुंबियांशी संपर्क न करणे असा आदेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी पतीला दिला आहे.
पत्नीच्या वतीने अँड अजिंक्य साळुंके, अँड मयूर साळुंके यांनी बाजू मांडली. अँड अमोल खोब्रागडे आणि अँड पल्लवी साळुंके यांनी सहकार्य केलॆ. स्मिता आणि राकेश ( नाव बदलेले) यांचा २००५ मध्ये प्रेमविवाह झाला. दोघेही पुण्यात एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांना २० वर्षांहून अधिक काळ ओळखत होते. शिक्षण घेत असताना एकमेकांशी मैत्री आणि प्रेम निर्माण झाले आणि दोघांनीं लग्न केले. लग्नाचा सर्व खर्च तिच्या पालकांनी केला. संसार सुरळीत चालू असताना राकेशला दारू पिण्याचे व्यसन लागले. पतीने २०११ मध्ये दारू पिऊन मानसिक आणि शारीरिक छळ केल्याबद्दल स्मिताने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कुटुंब आणि मुलाच्या दैनंदिन गरजा ती स्वतःच पूर्ण करत होती. पती काहीही करत नव्हता आणि जास्त मद्यपान करण्याच्या सवयीमुळे संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे ती २०१३ पासून पतीपासून विभक्त राहू लागली. पतीने तिच्यासह मुलीवर सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्यामुळे स्मिताने स्वतःच्या विवेकबुद्धी आणि पत्नीच्या मुलीच्या कल्याणासाठी ती त्याच्याबरोबर राहू शकत नव्हती . पती तिचे आणि तिच्या मुलीचे काहीतरी नुकसान करेल आणि आपल्यावर खोटे आरोप करेल. म्हणून, पत्नीने घटस्फोट चा अर्ज मान्य करण्याची विनंती करीत, अँड अजिंक्य साळुंके, अँड मयूर साळुंके यांच्यामार्फत न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. पत्नीने पतीला परस्परसंमतीने घटस्फोटाची विनंती केली; मात्र पतीने प्रत्येक वेळी नकार दिला आणि पत्नीला इशारा दिला की तो पत्नीला इतक्या सहजासहजी मुक्त होऊ देणार नाही. मात्र न्यायालयाने पत्नीच्या घटस्फोट, मुलीचा ताबा, कायमस्वरूपी पोटगी, लग्नाचा सर्व खर्च, पत्नीचे सर्व स्त्रीधन आणि पतीने पत्नीला संपर्क न करण्याचा आदेश देत, पत्नीच्या घटस्फोट अर्जास मान्यता देवून पतीला चांगलाच दणका दिला.
न्यायालयाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे घडले असेल की न्यायालयाने पत्नीला पोटगीसह लग्नात केलेला खर्च आणि स्त्रीधनाच्या सर्व गोष्टी पतीला देण्याचे आदेश दिले आहेत. या निकालामुळे पीडित पत्नींना न्याय मिळू शकेल- अँड अजिंक्य साळुंके, पत्नीचे वकील