अजितदादा, एकवेळ तुम्ही कृषिमंत्री व्हा,पण त्यांचा राजीनामा घ्या;रोहित पवारांचा कोकाटेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:08 IST2025-07-23T16:06:58+5:302025-07-23T16:08:37+5:30
- आमदाराच्या बंधूनी त्या ठिकाणी गोळीबार केला त्यात एका महिलेला इजा पोहोचली आहे, पोलीस जर माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर योग्य ठरणार नाही

अजितदादा, एकवेळ तुम्ही कृषिमंत्री व्हा,पण त्यांचा राजीनामा घ्या;रोहित पवारांचा कोकाटेंवर निशाणा
पुणे - शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न सुटण्याऐवजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या व्हिडिओवर टीका करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तर आज पुण्यात माध्यमांशी बोलतांना रोहित पवार म्हणाले, गेले काही महिने कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या विरोधातच बोलत आहेत. तुम्ही कुठेही रमी खेळा, पण कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत अहंकाराने बोलताय, शेतकऱ्यांना भिकारी म्हणताय, हा अहंकार बाजूला ठेवून बोला. जर असं वर्तन सुरूच राहिलं तर राजीनामा द्यावा लागेल.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, 'अजितदादांना सांगायचं आहे की कृषिमंत्री बदला, एक वेळ तुम्हीच कृषिमंत्री व्हा, पण कोकाटेंचा राजीनामा घ्या, अजितदादांवर यापूर्वी खोटे आरोप झाले होते, तेव्हाही त्यांनी राजीनामा दिला होता आणि कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ बसले होते. आता तुम्ही पक्षाचे प्रमुख आहात, मग तुमचे मंत्री जर अशा पद्धतीने वागत असतील तर याचा अर्थ तुमच्या मंत्र्यांवर तुमचा कंट्रोल नाही असं म्हणायचं का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी दौंडच्या कलाकेंद्र गोळीबार प्रकरणावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. एका आमदाराच्या भावाने गोळीबार करून एका महिलेला इजा पोहोचवली आहे. जर पोलीस माहिती दडपून ठेवत असतील तर योग्य नाही. उद्या या गोष्टी खर्या ठरल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी लागेल. सत्ताधाऱ्यांचा दबाव आणि पीडितेवर दबाव टाकला जात आहे, असा गंभीर आरोप पवार यांनी केला.