Ajit Pawar Passed Away: दादांची एक आठवण! २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडल्याने अजित पवार झाले होते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:13 IST2026-01-28T15:12:55+5:302026-01-28T15:13:58+5:30
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६९, तर राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित असताना, काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले होते

Ajit Pawar Passed Away: दादांची एक आठवण! २००४ साली मुख्यमंत्रिपद सोडल्याने अजित पवार झाले होते नाराज
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचे अकाली निधन झाले आहे. बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राने गमावला आहे. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. कालपर्यंत राजकारणात सक्रीय असणारे अजित पवार आज सकाळी या जगात नाहीत यावर कुणाचा विश्वास बसत नाही अशी घटना घडली. दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रच लढले होते. निवडणूक निकालात काँग्रेसला ६९, तर राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित असताना, काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळालं असतं, तर छगन भुजबळ, आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि तुलनेनं अधिक शक्यता असलेला चेहरा म्हणजे अजित पवार यांपैकी कुणाच्यातरी गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली असती. मात्र, शरद पवारांनी केलेल्या काही राजकीय तडजोडी आणि डावपेचांमुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही. पण याच डावपेचांवर अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
आताही सलग ७ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले अजित पवार उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले होते. काम म्हणजे काम हा ध्यास जवळ ठेवून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. बारामती, पिंपरीचिंचवड, पुणे याबरोबरच राज्यातील अनेक जिल्ह्यात अजितदादांना माननारा वर्ग आहे. ज्या बारामतीतून अजित पवारांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली. त्याच बारामतीत अजित पवारांचे अकाली निधन होणे हा विचित्र योगायोग समोर आला. अजित पवार हे प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून ओळखले जायचे. सकाळी ६ वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करायचे. विकास कामांची पाहणी दौरा असेल, अगदी सकाळी ते रस्त्यावर फिरून लोकांची कामे सोडवताना दिसायचे. आज मुंबईतून बारामतीला ते चालले होते. मात्र आजची सकाळी त्यांच्या आयुष्यातील शेवटची सकाळ ठरली आहे. ज्या बारामतीत त्यांचा जन्म झाला तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.