आमदाराचे मुलीला उचलून आणायचे धाडस होतेच कसे? अजित पवार यांची राम कदमांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 13:53 IST2018-09-05T13:43:47+5:302018-09-05T13:53:21+5:30
मुलीला उचलून आणण्याची भाजपा आमदार राम कदम यांची भाषा अशोभनीय असून आमदाराने बोलताना भान ठेवायला पाहिजे अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे.

आमदाराचे मुलीला उचलून आणायचे धाडस होतेच कसे? अजित पवार यांची राम कदमांवर टीका
पुणे - मुलीला उचलून आणण्याची भाजपा आमदार राम कदम यांची भाषा अशोभनीय असून आमदाराने बोलताना भान ठेवायला पाहिजे अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे.
दहीहंडी उत्सवादरम्यान भाजपा आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावरून गदारोळ उठला आहे. मुलीला उचलून आणू अशा आशयाचे वक्तव्य करणाऱ्या कदम यांच्यावर सध्या सर्वत्र टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही कदम यांना लक्ष केले असून पुण्यातील कार्यक्रमात पवार यांनी आपले मत मांडले आहे.
ते म्हणाले की, मुलीला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र तिला उचलून आणण्याचे आमदाराचे धाडस होतेच कसे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुलीला पळवून, उचलून आणण्याची आमदाराची भाषा अशोभनीय आहे अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली. कदम यांनी स्वतःच्या वक्तव्यावर माफी मागणे तर लांबच खेद करणे त्याहून चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान कदम यांच्या वक्तव्यावर पुण्यात मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले असून काँग्रेसच्या महिलाही आंदोलन करून निषेध नोंदवणार असल्याचे समजते.