Ajit Pawar Funeral: 'एकच वादा अजितदादा', सुरुवात बारामतीत अन् अखेरचा श्वासही बारामतीतच, अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:14 IST2026-01-29T12:14:23+5:302026-01-29T12:14:34+5:30
Ajit Pawar Funeral “दादा परत या…” हा आक्रोश करत बारामतीत काटेवाडी येथे लाखोंच्या जनसमुदायाने अजित पवारांना अखेरचा निरोप दिला

Ajit Pawar Funeral: 'एकच वादा अजितदादा', सुरुवात बारामतीत अन् अखेरचा श्वासही बारामतीतच, अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) सकाळी पावणे नऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. गुरूवारी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या लाखो कार्यकर्ते आणि बारामतीकरांच्या डोळ्यातील अश्रृंचा बांध फुटला.
मुंबईहून बारामतीकडेे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना बुधवारी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले. यानंतर संपूर्ण राज्यभर शोकाकूल वातावरण पसरले. अजित पवारांचा मृतदेह बारामती येथील पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. तेथे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
गुरूवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव सकाळी आठच्या सुमारास काटेवाडी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरातून अंतयात्रेला सुरूवात करण्यात आली. बारामती येथील पेन्सिल चौकातून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांना आणण्यात आले. त्यावेळी जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखातून, ‘अजित दादा अमर रहे’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी उपस्थित अनेकांना त्यांचे अश्रृ अनावर झाले होते. ‘दादा परत या परत या’ अशा घोषणा देखील उपस्थित जनसमुदायाकडून वारंवार देण्यात येत होत्या. अजित पवारांचे पार्थिव मैदानात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर ठेवण्यात आले. त्यानंतर वैदिक पद्धतीने मंत्रोच्चार करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बारामतीकरांनी पाळली शिस्त...
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जमला होता. यावेळी कोणतीही गडबड, गोंधळ न करता शिस्त पाळून त्यांच्या लाडक्या दादांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. पहाटे पाच वाजल्यापासून चाहत्यांनी मैदानावर गर्दी केली होती. जसजशी अंत्यसंस्काराची वेळ जवळ येत होती. तसतसा लाखोंच्या संख्येने जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात जमा होत होता. प्रत्येकाला अजित पवारांना शेवटचे बघण्याची इच्छा होती. मैदान परिसरात व बाहेरच्या बाजूला अजित पवारांचे अंतिम दर्शन सगळ्यांना व्हावे यासाठी डिजिटल स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.
११ हजार पोलिसांचा बंदोबस्त..
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संबंध राज्यभरातून मिळेल त्या वाहनाने लोकांनी बारामतीकडे धाव घेतली. या पार्श्वभूमीवर बारामती शहर व परिसरात अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांसह पुणे पिंपरी-चिंचवड, ठाणे, कोल्हापूर, सातारा येथील पोलिसांसह राज्य राखीव पोलिस (एसआरपी) असा ११ हजारांचा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र वाहतुकीचे देखील नियोजन करण्यात आले होते.
या मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, शिवेंद्रसिंह राजे भोसले, शंभुराज देसाई, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मेघना बोर्डीकर यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री नारायण लोकेश, सी. एम. रमेश, रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, आदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, गणेश नाईक, पंकजा मुंडे, सुशील कुमार शिंदे, जयंत पाटील, रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, गिरीष महाजन, महादेव जानकर, जयकुमार गोरे, डॉ. अमोल कोल्हे, राधाकृष्ण विखे पाटील, रितेश देशमुख, नरहरी झिरवळ, राहुल कुल, दत्तात्रय भरणे, धैर्यशील मोहिते पाटील, मकरंद पाटील, विजय शिवतारे, मंगल प्रभात लोढा, संजय राठोड, राजेंद्र गवई, श्रीकांत शिंदे, डॉ. प्रितम मुंडे, निवेदिता माने, राजेश टोपे, सचिन आहेर, सतीश चव्हाण, पोलिस महासंचालक सदानंद दाते, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.