Ajit Pawar: वाद टाळा, समजून घ्या; महायुतीच्या एकोप्यासाठी भाजपला अजित पवारांची साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 20:59 IST2026-01-24T20:58:34+5:302026-01-24T20:59:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आहोत, तर राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी आहोत.

Ajit Pawar: वाद टाळा, समजून घ्या; महायुतीच्या एकोप्यासाठी भाजपला अजित पवारांची साद
बारामती : केंद्र आणि राज्यात आपण सर्वजण एकत्रितपणे कारभार करत असताना स्थानिक पातळीवर वाद निर्माण होणे हे टाळणे गरजेचे आहे. बारामती व माळेगावमध्ये चांगल्या हेतूने बेरजेचे राजकारण करण्यात आले. २७ जानेवारी ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असल्याने ज्यांचे शब्द ऐकले जातात, त्यांच्यामार्फत नाराजांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, अशी स्पष्ट साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतील प्रमुख घटकपक्ष भाजपला घातली.
कन्हेरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात १५ उमेदवार उतरविल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही भूमिका मांडली.
पवार म्हणाले, काहीजणांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अजित पवारांना १८ उमेदवार मिळाले नाहीत, अशा अफवाही पसरवल्या जात आहेत. केंद्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आहोत, तर राज्यात महायुती सरकारमध्ये सहभागी आहोत. यापूर्वी माळेगावच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कमी लेखण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण त्यामुळे आम्हालाही स्वतंत्रपणे मैदानात उतरावे लागले. समोरच्या काही सहकारी मित्रांनी दोन पंचायत समिती जागांची मागणी केली होती, तर उर्वरित पंचायत समिती व जिल्हा परिषद जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात, अशी चर्चा झाली होती. मात्र, एकमेकांना विरोध करून काहीही साध्य होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे, असे पवार यांनी ठामपणे सांगितले.
इंदापुरात एकत्र आलो तर बिघडले कुठे?
इंदापूर तालुक्यात वाद घालण्यापेक्षा दत्तात्रेय भरणे आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले तर बिघडले कुठे, असा सवाल उपस्थित करत पवार म्हणाले, आम्ही भांडलो तर काहीजणांचे फावते. मात्र, आम्ही एकत्र आलो की त्यांना किंमत राहत नाही. प्रदीप गारटकर, प्रवीण माने हे आपणच घडवलेले कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते वाढले की पदे कमी पडतात, अपेक्षा वाढतात आणि नाराजी निर्माण होते. हे राजकारणात सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.